सायबर विश्व – कृत्रिम बुद्धिमत्ता आणि भाषिक न्यायाचा पेच

>> गणेश काळा आहे

जनरेटिव्ह एआयच्या उदयानंतर सामाजिक आणि आर्थिक विषमता वाढण्याची भीती व्यक्त होत असतानाच, हे तंत्रज्ञान आता जागतिक पातळीवर गंभीर भाषिक विषमता आणि सांस्कृतिक वर्चस्ववाद निर्माण करत आहे.

भाषा ही संवादाचे किंवा माहितीच्या देवाणघेवाणीचे साधन असण्याबरोबरच मानवी संस्कृती, लोकस्मृती, ज्ञानपरंपरा आणि जगण्यातील समग्र अनुभवांची ती जिवंत संवाहक असते. जगात जेव्हा एखादी भाषा नष्ट पावते तेव्हा शब्दांची व्यवस्था लोप पावते. तसेच जगाकडे पाहण्याची एक स्वतंत्र दृष्टी आणि शतकानुशतके संचित झालेले मानवी ज्ञान कायमचे अस्तंगत होते. आजच्या एकविसाव्या शतकातील डिजिटल क्रांतीच्या युगात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) विस्तार ज्या वेगाने होत आहे, त्याने मानवी जीवनाच्या अनेक क्षेत्रांना व्यापून टाकले आहे. परंतु, समाजशास्त्र आणि भाषाविज्ञानाच्या दृष्टीने या तंत्रज्ञानाचे सूक्ष्म अवलोकन केले, तर एक चिंताजनक वास्तव समोर येते. जनरेटिव्ह एआयच्या उदयानंतर सामाजिक आणि आर्थिक विषमता वाढण्याची भीती व्यक्त होत असतानाच, हे तंत्रज्ञान जागतिक पातळीवर गंभीर भाषिक विषमता आणि सांस्कृतिक वर्चस्ववाद निर्माण करत आहे.

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मुळाशी असणारे ‘लार्ज लँग्वेज मॉडेल्स‘ (महाभाषा प्रारूपे) इंटरनेटवरील अथांग माहितीच्या (डेटा) आधारे प्रशिक्षित केली जातात. येथेच विषमतेची खरी बीजे रोवली गेली आहेत. डिजिटल विश्वात ज्या प्रबळ आणि बहुसंख्य लोकांच्या भाषांचे साम्राज्य आहे, त्यांचाच प्रातिनिधिक साठा या मॉडेल्सना उपलब्ध होतो. परिणामी, जनरेटिव्ह एआय बहुसंख्य भाषिकांसाठी अत्यंत प्रभावीपणे काम करते, परंतु जगभरातील हजारो अल्पसंख्य, आदिवासी आणि मौखिक परंपरा असणाऱया भाषा या तंत्रज्ञानाच्या पटलावरून जवळपास गायब झाल्याचे दिसून येते. ज्या भाषांची ऑनलाइन उपस्थिती नगण्य आहे, त्यांच्याविषयी या प्रणालींकडे पुरेसा डेटा नसतो. जेव्हा अशा भाषांमध्ये ज्ञाननिर्मितीचा किंवा संवादाचा प्रयत्न केला जातो, तेव्हा चुकीची, तोकडी आणि दिशाभूल करणारी उत्तरे मिळण्याची शक्यता कैक पटींनी वाढते. जागतिक भाषिक परिघावरील वास्तव भाषिक सर्वेक्षणांच्या आधारे पाहिल्यास ही दरी अधिक तीव्रतेने जाणवते. पापुआ न्यू गिनीमधील ‘हुला’ ही भाषा बोलणाऱयांची संख्या केवळ सुमारे दहा हजारांच्या आसपास आहे, तर तिमोर-लेस्ते देशात मोठ्या प्रमाणावर बोलल्या जाणाऱया ‘टेटुन’ भाषेचे भाषक सुमारे दहा लाखांहून अधिक आहेत. ही दोन्ही उदाहरणे स्वतंत्र सांस्कृतिक समुहांची असली, तरी एआयच्या प्रशिक्षण साठ्यामध्ये या दोन्ही भाषांचे प्रतिनिधित्व अत्यंत नगण्य आहे. जेव्हा तंत्रज्ञान अशा भाषांना परिघाबाहेर फेकते, तेव्हा त्या भाषा बोलणाऱया समूहांना डिजिटल उपेक्षिततेचा सामना करावा लागतो. ही केवळ भाषेची उपेक्षा नसून त्या समुहांच्या ज्ञानव्यवस्थेचे केलेले पद्धतशीर दुर्लक्ष आहे. तंत्रज्ञानाचा हा भाषिक पूर्वग्रह ज्ञाननिर्मितीच्या जागतिक प्रक्रियेत एकाधिकारशाही निर्माण करू शकतो.

या गंभीर भाषिक अरिष्टाच्या सावटाखाली आशेचा एक किरणही हळूहळू आकार घेत आहे. गेल्या वर्षभरात संशोधकांच्या आणि अभ्यासकांच्या असे लक्षात आले आहे की, याच तंत्रज्ञानाचा उपयोग भाषेच्या जपणुकीसाठी उलट्या दिशेनेही केला जाऊ शकतो. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साधनांचा वापर करून स्थानिक समुदायांना स्वतच्या गरजांनुसार डिजिटल साधने, शब्दकोश आणि भाषिक प्रणाली विकसित करण्याचे स्वातंत्र्य मिळू लागले आहे. आदिवासी आणि वंचित समूहांच्या मौखिक ज्ञानाचे डिजिटायझेशन करणे, त्यांच्या बोलींचे ध्वनिमुद्रण जतन करणे आणि त्यांच्या भाषेतील कथा, म्हणी व पारंपरिक औषधी ज्ञान सुरक्षित ठेवणे आता शक्य होत आहे. तंत्रज्ञानाने भाषेवर वर्चस्व गाजविण्यापेक्षा स्थानिक भाषांनी तंत्रज्ञानाला आपल्या अभिव्यक्तीचे माध्यम बनविले पाहिजे.

कृत्रिम बुद्धिमत्तेचा हा प्रवास जर खऱया अर्थाने सर्वसमावेशक आणि न्याय्य करायचा असेल, तर केवळ इंग्रजी किंवा निवडक प्रबळ भाषांचे पोषण थांबवून जगातील प्रत्येक लहान-मोठ्या भाषेला तंत्रज्ञानाच्या मुख्य प्रवाहात जागा मिळवून देणे अपरिहार्य आहे. भाषा जिवंत राहिली तरच लोकसंस्कृती टिकेल, आणि लोकसंस्कृती टिकली तरच मानवी संवेदनशीलतेचा पाया भक्कम राहील. भविष्यातील तंत्रज्ञानाने भाषेचे वैविध्य नष्ट करणारे सपाटीकरण न करता, निसर्गातील जैवविविधतेप्रमाणेच मानवी भाषिक विविधता जपण्यासाठी एक सशक्त माध्यम म्हणून काम केले पाहिजे.

(लेखक संगणकतज्ञ आहेत)

Comments are closed.