अमेरिकेत हिंदू मंदिरावर हल्ला आणि तोडफोड

पुजारी-भाविकांच्या उपस्थितीवेळी खिडक्यांची तोडफोड

वृत्तसंस्था/ ओहायो

अमेरिकेतील ओहायो येथील एका हिंदू मंदिरावर दगड-विटांनी हल्ला झाल्यामुळे मोठे नुकसान झाले. हिंदू अमेरिकन फाउंडेशनच्या माहितीनुसार, श्री स्वामीनारायण वटताल धाम हिंदू मंदिराला शुक्रवारी दुपारी 1:30 वाजता लक्ष्य करण्यात आले. या हल्ल्यात मंदिराच्या खिडक्यांची तावदाने फोडण्यात आली. या हल्ल्यावेळी पुजारी आणि अनेक भाविक मंदिरात उपस्थित होते. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध असून, अधिकारी तपास करत आहेत. हिंदू स्वयंसेवक संघ यूएसएच्या माहितीनुसार, गेल्या पाच वर्षांत अमेरिकेत हिंदू मंदिरांना लक्ष्य करून तोडफोडीच्या 15 हून अधिक घटना घडल्या आहेत.

या हल्ल्याप्रकरणी अद्याप कोणालाही संशयित म्हणून जाहीर करण्यात आलेले नाही किंवा कोणालाही अटक झाल्याची तात्काळ पुष्टी झालेली नाही. तसेच तपास अधिकाऱ्यांनी अद्याप यामागे धार्मिक हेतू असल्याचेही म्हटलेले नाही. ओहायोसह अमेरिकेच्या अनेक भागांमध्ये हिंदू संघटना ‘हिंदू वारसा महिना’ साजरा करत असतानाच हल्ल्याची ही घटना घडली आहे. तसेच, ही घटना नवरात्रीच्या अगदी आधी घडली. अमेरिकेत दरवर्षी ऑक्टोबर महिन्यात ‘हिंदू वारसा महिना’ साजरा केला जातो. या काळात, हिंदू संघटना आणि समाजातील सदस्य हिंदू धर्म, संस्कृती, सण आणि परंपरांशी संबंधित कार्यक्रमांचे आयोजन करतात. याचा उद्देश लोकांना हिंदू संस्कृतीबद्दल शिक्षित करणे आणि अमेरिकेतील हिंदू समाजाची ओळख व परंपरा अधोरेखित करणे हा आहे.

Comments are closed.