अंमली पदार्थ तस्कर नवप्रीत सिंगचे प्रत्यार्पण
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पंजाबमध्ये अंमली पदार्थांची निर्यात करुन त्यांच्या विक्रीचे रॅकेट चालविणारा अंमली पदार्थ माफिया नवप्रीतसिंग याचे भारताला प्रत्यार्पण करण्यात आले आहे. हे प्रत्यार्पण तुर्किये या देशाकडून करण्यात आले असून त्यामुळे भारताचे अंमली पदार्थ विरोधी अभियान अधिक बळकट होणार आहे, अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिली आहे. नवप्रीतसिंग हा गेली दोन वर्षे बेपत्ता होता. त्याचा शोध घेण्यात आला असता, तो तुर्कियेमध्ये लपल्याचे आढळून आले. त्यामुळे भारताच्या परराष्ट्र व्यवहार विभागाने तुर्कियेमधून त्याला प्रत्यार्पित करुन घेतले असून त्याला भारतात आणण्यात आले आहे. त्याने खोट्या नावाने तुर्कियेचे नागरीकत्वही मिळविले होते. तेथून तो भारतात आणि पंजाबमध्ये अंमली पदार्थांची तस्करी करत होता. शनिवारी त्याला भारतात आणण्यात आले असून त्याची कसून चौकशी केली जाईल. त्याच्याकडून भारतील इतर अंमली पदार्थ माफिया आणि त्यांचे जाळ्यांची माहिती मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्याचे प्रत्यार्पण ही अत्यंत महत्वाची आणि ऐतिहासिक घटना आहे. केंद्राने डिसेंबर 2029 पर्यंत देशातील सर्व अंमली पदार्थ जाळ्यांचा नाश करण्याचा निर्धार केला असून नवप्रीतसिंग याचे प्रत्यार्पण या निर्धाराला बळ देणारे आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले.
Comments are closed.