बॅनर्जी यांच्या 'फ्रॅक्चर'ची चौकशी होणार आहे

वृत्तसंस्था/ कोलकाता

पश्चिम बंगालमध्ये 2021 विधानसभा निवडणुकीच्या प्रचार काळात तत्कालीन मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा पाय मोडल्याच्या प्रकरणाची चौकशी केली जाणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी यांनी या चौकशीचा आदेश दिला आहे. ममता बॅनर्जी यांचा पाय मोडल्याचे ते प्रकरण केवळ त्यांचे नाटक होते. फ्रॅक्चर झालेच नव्हते, असे प्रतिपादन त्यांनी शनिवारी येथे केल्याने खळबळ उडाली आहे.

ही घटना 11 मार्च 2021 या दिवशी घडली होती. पाय मोडल्यानंतर ममता बॅनर्जी यांनी पुढचा सर्व प्रचार पायाला प्लास्टर बांधलेल्या अवस्थेत केला होता. मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी यांनी यासंबंधीचा वैद्यकीय अहवाल उघड केला. हा अहवाल ‘बांगूर इन्स्टिट्यूट ऑफ न्यूरोसायन्सेस’ या वैद्यकीय संस्थेचा असल्याची माहिती त्यांनी दिली. ममता बॅनर्जी यांच्या पायाला फ्रॅक्चर झाल्याचे किंवा त्यांचे हाड सरकल्याचे कोणतेही लक्षण दिसत नाही, असे या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. ममता बॅनर्जी यांनी पाय मोडल्याचे नाटक केले होते. हा प्रकार त्यांनी नंदीग्राम येथे प्रचार करताना केला होता. यामुळे नंदीग्रामच्याच नव्हे, तर पश्चिम बंगालच्या जनतेचा अवमान झाला आहे. पाय मोडल्याचे नाटक करुन त्यांनी मतदारांची दिशाभूल केली. खोट्या मार्गाने त्यांची सहानुभूती मिळविली. हा प्रकार म्हणजे मतदारांची फसवणूकच आहे, असा आरोप शुभेंदू अधिकारी यांनी केला.

Comments are closed.