जुलैमध्येच विमान पाडण्याचा कट होता; फ्लायदुबईच्या सहवैमानिकाकडून धक्कादायक माहिती उघड
फ्लायदुबईच्या तेल अवीवला जाणाऱ्या विमानातील कॅप्टनवर हल्ला करून विमान पाडण्याचा प्रयत्न करणाऱ्या ओमानी सहवैमानिकाने जुलैमध्येच हा हल्ला करण्याचा कट आखला होता, अशी धक्कादायक आता माहिती समोर आली आहे. मात्र, त्यावेळी क्रू सदस्यांपैकी एका व्यक्तीशी मैत्री असल्याने त्याने शेवटच्या क्षणी हा कट पुढे ढकलल्याचे तपासात समोर आल्याचे इस्रायली माध्यमांनी म्हटले आहे.
एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार फ्लायदुबईच्या FZ1073 या विमानात ओमानी सहवैमानिक हामाम अल-हम्मामी याने कॅप्टन स्मित मच्छार यांच्यावर कॉकपिटमध्ये क्रॅश अॅक्सने हल्ला केला होता. विमान इस्रायलकडे जात असताना जॉर्डनच्या हवाई हद्दीत हा हल्ला करण्यात आल्याचे तपासातील प्राथमिक माहितीतून समोर आले आहे. तपास अधिकाऱ्यांना दिलेल्या माहितीनुसार, कॅप्टनला ठार केल्यानंतर विमान नेहमीप्रमाणे उडवत राहण्याचा त्याचा कथित कट होता. त्यानंतर तेल अवीवमधील बेन गुरियन विमानतळावरील इमारत किंवा दुसऱ्या विमानावर विमान आदळवून हल्ला करण्याचा त्याचा कथित प्लॅन होता. विमानतळावरील प्रयत्न अपयशी ठरल्यास तेल अवीवमधील एखाद्या गगनचुंबी इमारतीवर किंवा जॉर्डनमधील अमेरिकन लष्करी तळावर विमान आदळवण्याचा पर्यायही त्याने तपासल्याचे वृत्त आहे.
इस्रायली माध्यमांच्या वृत्तानुसार, अल-हम्मामीने जुलैमध्येच हा कट अंमलात आणण्याची योजना आखली होती. मात्र, क्रू सदस्यांपैकी एका व्यक्तीशी मैत्री असल्यामुळे त्याने शेवटच्या क्षणी हल्ला पुढे ढकलला. त्यानंतर त्याने जूनमध्ये इस्रायलला केलेल्या प्रवासादरम्यान विमानतळ आणि परिसराची माहिती गोळा करून हल्ल्याचे नियोजन केल्याचे तपासात समोर आल्याचे सांगण्यात येत आहे. फ्लायदुबई विमानकंपनीमध्ये नोकरी मिळण्यापूर्वीच त्याने हा कट आखला होता. तेल अवीवला कोणती विमान कंपनी उड्डाणे चालवते, याची माहिती घेतल्यानंतर त्याने फ्लायदुबईची निवड केल्याचा दावा तपास अधिकाऱ्यांसमोर केल्याचे वृत्त आहे.
Comments are closed.