सूर्यकुमार यादवला रणजी संघातून का वगळलं? MCAच्या अधिकाऱ्याने सांगितलं नेमकं कारण
आगामी रणजी ट्रॉफी (Ranji trophy) हंगामातील पहिल्या सामन्यासाठी 5 ऑक्टोबर रोजी मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (MCA) निवड समितीने संघाची घोषणा केली. या संघात स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवचे (Suryakumar Yadav) नाव नसल्याने क्रिकेट चाहते आश्चर्यचकित झाले. सूर्याने स्वतः सामना खेळण्याची इच्छा व्यक्त केली होती, असे सांगितले जात होते. तरीही निवड समितीने त्याचा संघात समावेश केला नाही. आता MCAच्या एका सूत्राने सूर्यकुमारला रणजी संघात स्थान का मिळाले नाही, याचे कारण स्पष्ट केले आहे.
सूर्यकुमार यादवला संघाबाहेर ठेवण्यामागचे सर्वात मोठे कारण म्हणजे तो संघाच्या सामन्यापूर्वी आयोजित करण्यात आलेल्या प्रशिक्षण शिबिराला सातत्याने गैरहजर होता. रिपोर्ट्सनुसार, MCAच्या एका सूत्राने सांगितले की, मुंबईचा संघ गेल्या महिनाभरापासून लाल चेंडूने सराव करत आहे. मात्र, सूर्यकुमार गेल्या काही काळापासून लाल चेंडूच्या क्रिकेटपासून दूर आहे. त्याने प्रशिक्षण शिबिरातही सहभाग घेतला नव्हता. अलीकडच्या काळात त्याने एकही लाल चेंडूचा सामना खेळलेला नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, निवड समितीने सुमारे 10 दिवसांपूर्वी सूर्यकुमारशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्याच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर सूर्यकुमारने स्वतःला निवडीसाठी उपलब्ध असल्याचे सांगितले. मात्र, गेल्या महिनाभरापासून सातत्याने मेहनत करणाऱ्या युवा खेळाडूंना बाहेर बसवून सूर्यकुमारचा संघात समावेश करणे योग्य ठरणार नाही, असे निवड समितीचे मत होते. त्यामुळे 11 ते 14 ऑक्टोबरदरम्यान चंदीगडविरुद्ध होणाऱ्या पहिल्या सामन्यासाठी सूर्यकुमारची 16 सदस्यीय संघात निवड करण्यात आली नाही.
मात्र, सूर्यकुमारसाठी मुंबई संघाचे दरवाजे पूर्णपणे बंद झालेले नाहीत. पुन्हा संघात स्थान मिळवायचे असल्यास त्याला मुंबई क्रिकेट संघटनेच्या स्थानिक स्पर्धांमध्ये, जसे की पोलीस शील्ड किंवा पुरुषोत्तम शील्डमध्ये खेळून आपला फॉर्म सिद्ध करावा लागेल.
दुसरीकडे, मुंबई संघाला आणखी एक धक्का बसला आहे. अष्टपैलू शार्दुल ठाकूर (Shardul Thakur) सरावादरम्यान हाताला झालेल्या दुखापतीमुळे किमान एक महिना संघाबाहेर राहणार आहे. या हंगामातील पहिल्या सामन्यासाठी सिद्धेश लाडची कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. हंगामातील उर्वरित सामन्यांमध्येही सिद्धेश लाड कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळताना दिसू शकतो. दरम्यान, यशस्वी जयस्वाल (Yashsvi jaiswal) आणि सरफराज खान (Sarfaraz Khan) यांसारख्या प्रमुख खेळाडूंचाही मुंबईच्या संघात समावेश करण्यात आला आहे.
Comments are closed.