केस गळाले, शरीर सुजलं… पण आयुष्य थांबलं नाही; कॅन्सरनंतर सोनाली बेंद्रेचा आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला
बॉलिवूड अभिनेत्री सोनाली बेंद्रेच्या आयुष्यात 2018 हे वर्ष मोठा बदल घेऊन आलं. हाय ग्रेड मेटास्टॅटिक कॅन्सरचं निदान झाल्यानंतर सोनालीने न्यूयॉर्कमध्ये उपचार घेतले. या कठीण काळात तिला अनेक शारीरिक आणि मानसिक आव्हानांना सामोरं जावं लागलं. मात्र या संपूर्ण प्रवासाने तिच्या आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलून टाकला. आता एका मुलाखतीत सोनालीने कॅन्सरच्या काळातील अनुभव आणि त्यानंतर झालेल्या बदलांविषयी मनमोकळेपणाने भाष्य केलं.
सौमित्र पोटेंच्या ‘मित्र म्हणे’ या कार्यक्रमातील मुलाखतीत सोनालीने सांगितलं की, तिच्यासाठी दिसणं हा तिच्या व्यक्तिमत्त्वाचा महत्त्वाचा भाग होता. अभिनेत्री म्हणून तिची ओळखही मोठ्या प्रमाणात तिच्या लूकशी जोडलेली होती. मात्र कॅन्सरच्या उपचारांदरम्यान परिस्थिती पूर्णपणे बदलली. केमोथेरपीदरम्यान केस गळू लागले, औषधांमुळे शरीराला सूज आली आणि आरशात दिसणारं स्वतःचं रूपही बदललं. या सगळ्या अनुभवातून आपलं शरीर किती नश्वर आहे, याची जाणीव झाल्याचं सोनालीने सांगितलं. तिच्या आईने लहानपणी सांगितलेली ‘खरं सौंदर्य माणसाच्या आत असतं’ ही शिकवणही तिला या काळात पुन्हा आठवली.
कॅन्सरच्या काळात सोनालीने थेरपीचीही मदत घेतली. अशा प्रसंगी कुटुंबीय, मित्र आणि जवळच्या व्यक्तींचा आधार किती महत्त्वाचा असतो, हे तिला प्रकर्षाने जाणवलं. मात्र मजबूत सपोर्ट सिस्टम एका दिवसात तयार होत नाही. नाती निर्माण करण्यासाठी आणि ती घट्ट होण्यासाठी वेळ द्यावा लागतो, असं तिने सांगितलं. या संपूर्ण प्रवासात सोनालीला आपल्या आयुष्यातील माणसांची खरी किंमतही कळली. कठीण काळात कोण आपल्या पाठीशी उभं राहतं, कोण आपल्यावर मनापासून प्रेम करतं, याची जाणीव तिला झाली. त्यामुळे आयुष्यातील प्रत्येक दिवसाकडे नव्या नजरेने पाहायला तिने सुरुवात केली.
सोनालीने उपचारांच्या काळात विग वापरण्याचाही प्रयत्न केला. मात्र विगमुळे खूप घाम येत असल्याने तिला त्रास होत होता. त्यावेळी बाह्य सौंदर्यापेक्षा आयुष्य किती मोठं आहे, याची जाणीव तिला झाली. सौंदर्यात बदल झाला म्हणून आयुष्य संपत नाही, हे तिने स्वीकारायला शिकल्याचं सांगितलं. कठीण प्रसंगांमध्ये वास्तवापासून पळण्यापेक्षा त्याचा स्वीकार करणं गरजेचं आहे, असंही सोनाली म्हणाली. आपल्या आयुष्यात काही गोष्टी घडणार नाहीत, असं आपण स्वतःला समजावत असतो. मात्र जेव्हा एखादा गंभीर प्रसंग प्रत्यक्ष समोर येतो, तेव्हा परिस्थिती स्वीकारण्याशिवाय पर्याय राहत नाही. त्यातून पुढे जाण्यासाठी स्वतःला त्या वास्तवाला सामोरं जावं लागतं, असं तिचं म्हणणं आहे.
Comments are closed.