रशियाचे युक्रेनवर भीषण क्षेपणास्त्र हल्ले; ऊर्जा व पायाभूत सुविधांना केले लक्ष्य, युक्रेनमध्ये 11 ठार

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

रशिया आणि युक्रेनमधील युद्ध दिवसेंदिवस अधिक तीव्र होत आहे. आता रशियाने युक्रेनवर मोठा हल्ला केला आहे. रशियाच्या सैन्याने शस्त्रे आणि ड्रोनचा वापर करून कीव आणि युक्रेनमधील इतर अनेक प्रदेशांमधील लष्करी-औद्योगिक सुविधांवर मोठा हल्ला चढवला आहे. या हल्ल्यांमध्ये जमिनीवरून, समुद्रातून आणि हवेतून डागण्यात येणाऱ्या शस्त्रास्त्रांचा तसेच मोठ्या प्रमाणावर ड्रोनचा प्रभावी वापर करण्यात आल्याची माहिती रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने बुधवारी दिली. रशियाने केलेल्या या आक्रमक कारवाईमुळे युक्रेनमध्ये मोठी खळबळ उडाली असून या भीषण हल्ल्यांमध्ये युक्रेनमध्ये किमान 11 जण ठार झाल्याचे सांगण्यात येत आहे.

मंत्रालयाच्या माहितीनुसार, या हल्ल्यांमध्ये कीवमधील ‘फायर पॉइंट’द्वारे चालवल्या जाणाऱ्या सुविधांचा प्रामुख्याने समावेश होता, जिथे फ्लेमिंगो क्रूझ क्षेपणास्त्रे, मध्यम व लांब पल्ल्याचे ड्रोन तयार करून साठवले जातात. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, कीवशिवाय चेर्निहीव, किरोवोग्राद, ड्निप्रोपेत्रोव्स्क, पोल्टावा आणि खार्किव प्रदेशांमधील लष्करी-औद्योगिक स्थळांनाही रशियन सैन्याने आपल्या हल्ल्यात लक्ष्य केले आहे. दरम्यान, रशियाने देशाच्या ऊर्जा पायाभूत सुविधांना विशेष लक्ष करून ड्रोनसह सुमारे 70 क्षेपणास्त्रे डागली, अशी माहिती युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांनी दिली आहे. या भीषण हल्ल्यांमध्ये युक्रेनमध्ये किमान 11 जण ठार झाल्याचे समोर आले आहे. ऊर्जा पायाभूत सुविधा हे मुख्य लक्ष्यांपैकी एक असल्याचे सांगत, या हल्ल्याद्वारे मोठे नुकसान पोहोचवण्याचा आणि एक कडक संदेश देण्याचा रशियाचा स्पष्ट प्रयत्न असल्याचा गंभीर आरोप झेलेन्स्की यांनी केला आहे.

टेलिग्रामवरील एका पोस्टमध्ये झेलेन्स्की यांनी म्हटले की, आमच्या ऊर्जा पायाभूत सुविधा हे प्रमुख लक्ष्यांपैकी एक होते आणि रशियन सैन्याला मोठा हल्ला करायचा होता. तसेच, रशियन बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे हे सध्या युक्रेनपुढील सर्वात मोठे आव्हान असल्याचे सांगत देशासाठी अतिरिक्त हवाई संरक्षण प्रणाली ही आता अत्यंत अत्यावश्यक गरज बनली आहे, अशी आक्रमक मागणी त्यांनी केली आहे.

Comments are closed.