फिनिक्स क्लासेसच्या संचालकांनी जीवन संपवले; बिल्डरच्या त्रासामुळे टोकाचा निर्णय घेतल्याचा पत्नीचा आरोप, मृतदेह ताब्यात घेण्यास नकार

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

छत्रपती संभाजीनगर येथील फिनिक्स इंग्लिश अकॅडमीचे संचालक व इंग्रजी विषयाचे प्रसिद्ध शिक्षक मोहन शिवराम कोरडे (वय – 60, रा. द्वारकापुरी, एकनाथनगर, गुरूगोविंदसींगपुरा) यांनी मंगळवारी दुपारी तीनच्या सुमारास तापडिया टॉकीज कॅम्पसमधील फिनिक्स क्लासेसमध्ये विषारी द्रव्य प्राशन केले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी त्यांना मिनी घाटी रुग्णालयात दाखल केले. मात्र, आज पहाटे साडे चारच्या सुमारास उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

मोहन कोरडे यांच्या पत्नी सुनीता कोरडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या मालकीचा क्लास रिकामा करण्यासाठी संबंधित बिल्डरकडून काही दिवसांपासून त्रास दिला जात होता. यासंदर्भात तसेच अन्य काही प्रकरणांमध्ये त्यांनी सिडको एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिले होते. मात्र, पोलिसांकडून अपेक्षित दखल घेतली जात नसल्याने ते काही दिवसांपासून मानसिक तणावात होते. त्यातूनच त्यांनी आत्महत्येचे पाऊल उचलल्याचा आरोप त्यांच्या पत्नीने केला आहे.

दरम्यान, कोरडे यांनी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये नमूद केलेल्या व्यक्तींवर कारवाई होईपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका घेत सुनीता कोरडे यांनी एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात धाव घेतली होती. सध्या सिडको एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

25 वर्षांपासून क्लासेस

कोरडे हे गेल्या 25 वर्षांपासून फिनिक्स क्लासेसफच्या माध्यमातून सिडको, संभाजीपेठपुरा, क्रांती चौक व गुरूगोविंदसींगपुरा परिसरात इंग्रजीचे अध्यापन करत होते. तज्ज्ञ व लोकप्रिय शिक्षक म्हणून त्यांची ओळख होती. शेकडो विद्यार्थी या क्लासेसमध्ये शिक्षण घेत होते. एका लोकप्रिय क्लासेसच्या संचालकाने आत्महत्या केल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. त्यांच्या पश्चात आई, पत्नी व मुलगा असा परिवार आहे.

Comments are closed.