अमेरिकेकडून तेजससाठी 4 इंजिन्सचा पुरवठा – TMarathiNews
जीई एअरोस्पेसकडून एफ404-आयएन20 इंजिन एचएएला प्राप्त
वृत्तसंस्था, नवी दिल्ली
स्वदेशी ‘तेजस’ लढाऊ विमानाच्या निर्मितीला चालना मिळणार आहे. अमेरिकेतील जीई एअरोस्पेसने सप्टेंबरमध्ये तेजस लढाऊ विमानांसाठी 4 एफ404-आयएन20 इंजिन्स भारताला सुपूर्द केली. हिंदुस्थान एअरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) आणि भारतीय वायुदलासोबत भागीदारी करत तेजस कार्यक्रमासाठी आवश्यक इंजिन्सचा पुरवठा करण्यावर कंपनीने भर दिला आहे. जीई एअरोस्पेसच्या प्रवक्त्याने बुधवारी यासंबंधी माहिती दिली आहे.
ऑगस्टमध्येही जीई एअरोस्पेसने एचएएलला तीन एफ404-आयएन20 इंजिन्स पुरविली होती. त्यामुळे तेजस कार्यक्रमासाठी इंजिन पुरवठ्यात हळूहळू सुधारणा होत असल्याचे चित्र आहे. एलसीए तेजस एमके1ए कार्यक्रमासाठी एफ404 इंजिनांच्या पुरवठ्यात झालेल्या विलंबाचा परिणाम विमानांच्या उत्पादनावर झाला होता. एचएएलची उत्पादन व्यवस्था तयार असली, तरीही विमानांची डिलिव्हरी इंजिनांच्या उपलब्धतेवर अवलंबून आहे. जीईकडून चालू वर्षाच्या दुसऱ्या सहामाहीत 20 इंजिन्सचा पुरवठा होण्याचे आश्वासन मिळाले.
तेजस उत्पादनाला मिळणार वेग
इंजिनांचा पुरवठा सुरळीत झाल्यास एलसीए एमके1ए तेजस विमानांचे उत्पादन आणि वायुदलाला होणाऱ्या डिलिव्हरीला वेग मिळण्याची शक्यता आहे. एचएएलने उत्पादनासाठी आवश्यक पायाभूत सुविधा तयार असल्याचे स्पष्ट केल. जीई एअरोस्पेसने तेजस कार्यक्रमासाठी इंजिन पुरवठ्यात आपली भूमिका महत्त्वाची असल्याचे सांगितले असून एचएएल आणि वायुदलासोबतच्या सहकार्याबद्दल कंपनीने समाधान व्यक्त केले आहे.
Comments are closed.