आजपासून विरारमध्ये कुमार-कुमारींचा कबड्डी रणसंग्राम, राज्य संघटनेचा गोंधळ कायम; 25 जिल्ह्यांचे 50 संघ मैदानात
राज्य कबड्डी संघटनेचा गोंधळ, सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या प्रशासकांची माघार आणि ऐनवेळी स्पर्धेची धुरा सोपविण्यात आलेल्या तात्पुरत्या समितीला मिळालेला अत्यल्प वेळ… अशा प्रतिकूल परिस्थितीतही पालघर जिल्हा कबड्डी संघटनेने वसई-विरार महानगरपालिकेच्या सहकार्याने 53व्या कुमार-कुमारी राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेचे शिवधनुष्य उचलले आहे. 8 ते 11 ऑक्टोबरदरम्यान विरार क्रीडा संकुलात कबड्डीचा धडाका रंगणार असून, 25 जिह्यांचे 50 संघ आणि तब्बल 800 खेळाडू या रणसंग्रामात उतरतील.
राष्ट्रीय स्पर्धेलाही लाजवेल अशी क्रीडानगरी
स्पर्धा कुमार-कुमारींची असली तरी आयोजनात कुठलीही कसर सोडण्यात आलेली नाही. चार हजार प्रेक्षकांची आसन क्षमता आणि तब्बल सहा मॅटची मैदाने अशी भव्य क्रीडानगरी विरार क्रीडा संकुलात सज्ज झाली आहे. त्यामुळे सामने वेगाने आणि वेळेत पूर्ण करण्याचा मानस असल्याचे पालघर जिल्हा कबड्डी संघटनेचे सचिव मनोज ठाकूर यांनी सांगितले. वादविरहित आणि विघ्नरहित आयोजनाचे आव्हानही पालघरने स्वीकारले आहे.
कुमारींचे जेतेपद राखण्याचे पालघरसमोर आव्हान
गतवर्षी पिंपरी-चिंचवड येथे झालेल्या स्पर्धेत पालघरने बलाढय़ पुण्याला नमवत प्रथमच कुमारी गटाचे विजेतेपद पटकावले होते. त्यामुळे यंदा यजमान पालघरसमोर जेतेपद राखण्याचे मोठे आव्हान आहे. कुमार गटात गतवर्षी ठाणे ग्रामीण विजेता ठरला होता. यंदा केवळ जिल्ह्यांचे संघ मैदानात असल्याने ठाणे पुन्हा जोरदार कामगिरीसाठी सज्ज आहे. मुंबई उपनगर, पुणे, अहिल्यानगर, रायगड आणि सांगली यांच्याकडूनही कडवी झुंज अपेक्षित आहे. मात्र काही जिल्हे नेहमीप्रमाणे केवळ हजेरी लावण्यासाठी येणार असल्याचे चित्रही दिसत आहे.
राज्य संघटनेच्या पदाधिकाऱयांविनाच स्पर्धा
राज्य कबड्डी संघटनेचा कारभार प्रशासकाकडे असतानाच प्रशासकांनी पदभार स्वीकारल्यानंतर जबाबदारीतून मुक्त झाल्याचे कळवले. त्यामुळे संघटना सध्या प्रशासकाविनाच आहे. या पार्श्वभूमीवर कुमार-कुमारी स्पर्धेच्या आयोजनासाठी हिंदुस्थानी हौशी कबड्डी महासंघाने तात्पुरती समिती नियुक्त केली आहे. अर्जुन पुरस्कारप्राप्त शांताराम जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ही समिती स्पर्धेची धुरा सांभाळणार आहे. दरम्यान, गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात राज्य कबड्डी संघटनेच्या प्रशासकासंदर्भातील याचिकेवर सुनावणी होणार आहे. त्यामुळे मैदानावर खेळाडूंचा संघर्ष आणि मैदानाबाहेर संघटनेतील घडामोडी, अशा दुहेरी लढतीचे केंद्रस्थान पुढील चार दिवस विरार बनणार याबाबत कुणाच्याही मनात शंका नाही.
Comments are closed.