राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा केंद्रीय पथकाकडून आढावा, राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा केंद्रीय पथकाकडून आढावा; प्रत्यक्ष पाहणी करून केंद्राला अहवाल देणार
राज्यातील दुष्काळी परिस्थिती आणि पिकांच्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी केंद्र सरकारचे 11 सदस्यीय पथक आज राज्यात दाखल झाले. 11 ऑक्टोबरपर्यंत हे पथक दुष्काळग्रस्त भागाची पाहणी करणार असून आज राज्य शासनाने या पथकाला दुष्काळग्रस्त भागातील स्थितीबाबत सादरीकरण केले. पाऊस, पिकांचे नुकसान, पिण्याच्या पाण्याची उपलब्धता आदींबाबत या पथकाला माहिती देण्यात आली.
केंद्राच्या कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाचे संयुक्त सचिव मुक्तानंद अग्रवाल या पथकाचे प्रमुख आहेत. केंद्र शासनाच्या कृषी, जलसंपदा, ग्रामीण विकास, पाणीपुरवठा, अन्न व सार्वजनिक वितरण, पशुसंवर्धन, अर्थ विभाग, नीती आयोग आणि अन्य संबंधित विभागांतील प्रशासकीय अधिकाऱयांचा या पथकामध्ये समावेश आहे. या 11 सदस्यांची तीन पथके बनवली गेली असून ती पुणे, अहिल्यानगर आणि संभाजीनगर विभागातील दुष्काळग्रस्त भागाची पाहणी करणार आहेत.
या केंद्रीय पथकाला सह्याद्री अतिथीगृह येथे राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्या उपस्थितीत दुष्काळग्रस्त भागांच्या परिस्थितीबाबत सादरीकरण करण्यात आले. पावसाच्या कमतरतेमुळे महाराष्ट्रातील काही भागांत निर्माण झालेली पाणीटंचाई, टँकर्सची संभाव्य गरज, शेतीवर अवलंबून असलेले शेतमजूर व जमीनधारकांचे प्रश्न, मजुरांची स्थलांतराची शक्यता आणि शेतकरी आत्महत्या या बाबींकडे यावेळी केंद्रीय पथकाचे लक्ष वेधले गेले. राज्य शासनाने केलेले सादरीकरण व आकडेवारी तसेच विविध विभागांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे केंद्रीय पथकाने कोणत्या भागांची प्रत्यक्ष पाहणी करायची याचे नियोजन केले आहे.
Comments are closed.