ज्ञानेश कुमार यांच्या नियुक्तीला आव्हान
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि निवडणूक आयुक्त सुखबीर सिंग संधू व विवेक जोशी यांच्या नियुक्तीला आव्हान देणारी एक याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. निवडणूक आयोगातील या नियुक्त्या करताना कायद्यातील अटींचे योग्यरित्या पालन केले नसल्याचा आरोप सुरी पैला यांनी दाखल केलेल्या याचिकेत करण्यात आला आहे. याचिकेनुसार, निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीसंबंधीच्या विद्यमान कायद्याच्या कलम 6 नुसार, शोध समितीने प्रत्येक रिक्त पदासाठी पाच जणांचे पॅनेल तयार करणे आवश्यक होते, असा युक्तिवाद करण्यात आला आहे. मार्च 2024 मध्ये निवडणूक आयुक्तांची दोन पदे रिक्त होती. या जागांसाठी समितीने 10 नावांची शिफारस करायला हवी होती.
मात्र, शोध समितीने केवळ सहा नावांची शिफारस केल्याचा आरोप याचिकाकर्त्यांनी केला आहे. याचिकाकर्त्यांनी केलेले हे दावे सुनावणीदरम्यान टिकतात की नाही हे आता पहावे लागेल. ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात यापूर्वीही याचिका दाखल झाल्या असल्या तरी त्या न्यायालयात टिकलेल्या नाहीत. सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या निलंबनाची मागणी करणाऱ्या याचिकांवर अंतरिम आदेश देण्यास नकार दिला होता. या याचिकांमध्ये ज्ञानेश कुमार यांच्या कार्यशैलीवर आणि एसआयआर प्रक्रियेसंबंधित त्यांच्या निर्णयांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. या आरोपांसंदर्भात न्यायालयाने केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगाला नोटीस बजावली आहे.
Comments are closed.