Nana Patekar नियतीचा खेळ सारा
>> डॉ. जब्बार पटेल, ज्येष्ठ दिग्दर्शक
नानांचे जाणे खूप अकाली आहे. खूप अनपेक्षित आहे. नाना मनमिळाऊ, शांत माणूस. केव्हाही फोन करायचा. गप्पा मारायचा. ‘सिंहासन’ हा त्याचा पहिला चित्रपट. त्याआधी ‘पाहिजे जातीचे’ या नाटकात मी त्याला पाहिले होते. मला त्याचे काम आवडले होते. मी त्याला म्हटले, मी एक फिल्म करतोय. तू काम करशील का? नाना लगेच तयार झाला. त्याने मनापासून काम केले. त्यात तो एक माफिया असतो. एका सीनमध्ये त्याला मारहाण होते असे दाखवायचे असते. मी नानाला म्हटले, की तू चेहऱ्यावर वेदना दाखव. कारण संपूर्ण कॅमेरा तुझ्या चेहऱ्यावर असेल. फक्त क्लोजअप घ्यायचा आहे. नाना म्हणाला, ‘ते खोटे मारताहेत, मग वेदना खऱ्या कशा येणार? मला खरे मारायला सांगा. त्यानंतर तू क्लोजअप घे.’ शेवटी त्याने स्टंटमनकडून स्वत-ला खरेच मारून घेतले. असा हा एकदम मनस्वी माणूस.
‘घाशीराम कोतवाल’, ‘तीन पैशांचा तमाशा’ ही माझी नाटकं त्याने अनेकदा पाहिली होती. त्याला माझ्याकडून नेहमी वेगळा रोल हवा होता. नंतरच्या सिनेमांत मला त्याला जागा देता आली नाही. खानोलकरांच्या कथेवर आधारित एक चांगले प्रोजेक्ट राहून गेले.
नानाने शेतकऱ्यांसाठी खूप काम केले. साध्या साध्या माणसांवर तो मनापासून प्रेम करायचा. कुणाचीही भीड बाळगायचा नाही. तोंडावर थेट बोलायचे. अगदी राजकीय नेत्यांनाही सोडायचा नाही. कथा-कविता आणि शास्त्रीय संगीत या आमच्या आवडीनिवडी. या विषयांवर कितीतरी तास आम्ही बोलत असू.
नाना गेला. माझा नियतीवर विश्वास नाही, पण हा नियतीचाच खेळ आहे. तो हवा होता पण नाही हे खरे सत्य आहे; पण त्याला जायचं होतं हेही तितकंच खरं आहे.
प्रायोगिक रंगभूमीपासून सुरुवात
नाना पाटेकर यांचा प्रायोगिक व व्यावसायिक रंगभूमीपासून सुरू झालेला अभिनयप्रवास चित्रपटसृष्टीच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरला गेला आहे. ‘हमीदाबाईची कोठी’, ‘पुरुष’ यांसारख्या नाटकांतून त्यांनी अमिट छाप सोडली. ‘पुरुष’ नाटकातील त्यांची खलनायकी छटा असणारी भूमिका आजही रसिकांच्या अंगावर काटा आणते. ख्यातनाम नाटय़दिग्दर्शिका विजया मेहता यांना ते गुरू मानायचे. भूमिका लहान असो, मोठी असो… त्यात ताकद असते. नाटकाच्या तालमी करताना काहीतरी वेगळे सुचले पाहिजे. ते शोधत राहिलात तरच नट म्हणून टिकलात, असा मंत्र नवोदित कलाकारांना ते द्यायचे.
Comments are closed.