पूर्णेकर हत्या प्रकरण – भयमुक्त ठाण्यासाठी आज पोलीस आयुक्तालयावर सर्वपक्षीय मोर्चा

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

शिवसेना विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या निर्घृण हत्येने ठाणेकरांच्या मनात धुमसत असलेला संताप आता रस्त्यावर उतरणार आहे. ‘भयमुक्त ठाणे’चा नारा बुलंद करत उद्या दुपारी 4 वाजता ठाणे महापालिका येथून भव्य मोर्चा काढण्यात येणार असून हा मोर्चा थेट पोलीस आयुक्तालयावर धडकणार आहे. शिवसेना, मनसे, राष्ट्रवादी, काँग्रेस, धर्मराज्य पक्ष, ‘आप’ आणि आरपीआयच्या कार्यकर्त्यांसह हजारो ठाणेकर विविध सामाजिक संस्था आणि संघटनांचे कार्यकर्ते या मोर्चात सहभागी होणार आहेत. शहरात रोज पडणारे खून, फोफावलेली गुन्हेगारी, खंडणीखोर गुंड, ड्रग्जमाफियांचे थैमान आणि राजकीय दहशतीविरोधात उद्याच्या मोर्चातून सरकार आणि पोलिसांना जाब विचारला जाणार आहे.

पूर्णेकर यांच्या हत्येला दहा दिवस उलटले तरी सगळे आरोपी शोधण्यात पोलिसांना अपयश आले आहे. पूर्णेकर कुटुंबीयांनी शिंदे गटाच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे आणि त्यांचा नवरा राजेंद्र शिंदे यांनीच हत्येचा कट रचल्याचा आरोप करूनही त्यांच्यावर थेट एफआयआर दाखल करण्यात आला नाही. शिवसेनेच्या आंदोलनानंतर पुरवणी जबाबात त्यांचे नाव येऊनही त्यांना साधे चौकशीलाही बोलावलेले नाही. राजकीय दबावाखाली ठाण्याची पोलीस यंत्रणा काम करत आहे काय, असा सवाल करत शिवसेनेसह सर्व पक्षांच्या लोकप्रतिनिधींनी बुधवारी पोलीस महासंचालक सदानंद दाते यांची भेट घेऊन या गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. या मोर्चात शिवसेना नेते राजन विचारे, जिल्हाप्रमुख केदार दिघे, राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड, शहराध्यक्ष मनोज प्रधान, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष राहुल पिंगळे, धर्मराज्य पक्षाचे अध्यक्ष राजन राजे, आम आदमी पक्षाचे अमर आमटे, आरपीआयचे संदीप खांबे यांच्यासह हजारो पदाधिकारी व कार्यकर्ते आणि ठाण्यातील विविध संस्था, संघटना आणि सामाजिक कार्यकर्तेही सहभागी होणार आहेत.

Comments are closed.