वायुसेना दिनी शौर्याचा ध्वज आकाशात फडकला.
विविध प्रात्यक्षिकांद्वारे वीरांना सलाम : सूर्य किरण, सारंग पथकांची नेत्रदीपक कामगिरी
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
भारतीय हवाई दल दिन दरवर्षी 8 ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो. हवाई दल दिन हा राष्ट्राच्या सुरक्षेत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या हवाई योद्ध्यांच्या शौर्य, शिस्त आणि समर्पणाचा सन्मान करण्याचा प्रसंग असतो. या दिवशी, देशभरातील लोक हवाई दलातील जवान आणि अधिकाऱ्यांप्रति आदरभाव व्यक्त करत त्यांच्या अदम्य शौर्याचे स्मरण करतात. हवाई दल दिन हा केवळ एक लष्करी प्रसंग नाही, तर राष्ट्रसेवेला प्रथम स्थान देणाऱ्या सैनिकांप्रति आणि त्यांच्या कुटुंबीयांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस देखील आहे.
94 व्या हवाई दल दिनानिमित्त गुरुवारी जोधपूर हवाई तळावरील आकाश तीन रंगांनी उजळून निघाले होते. भारतीय हवाई दलाच्या सूर्य किरण अॅरोबॅटिक टीमने (एसकेएटी) हवाई तळावर एक नेत्रदीपक प्रदर्शन सादर केले. त्यांच्यासोबत ‘सारंग’ हेलिकॉप्टर अॅरोबॅटिक टीमचाही सहभाग होता. जोधपूर हवाई दल स्थानकावर सुरू असलेल्या ‘तरंग शक्ती’ या हवाई सरावादरम्यान, एसकेएटी टीमने गुरुवारी अचूक उड्डाणाचे उत्कृष्ट प्रदर्शन केले. वैमानिकांचे अतुलनीय कौशल्य, व्यावसायिकता आणि अद्वितीय क्षमता पाहून प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले.
‘एसकेएटी’ व्यतिरिक्त सुखोई-30 एमकेआय आणि स्वदेशी लढाऊ हेलिकॉप्टर ‘प्रचंड’ यांनीही या हवाई प्रदर्शनादरम्यान आपली हवाई कसरत सादर केली. हवाई दल, लष्कर आणि स्थानिक प्रशासनाचे अधिकारी, तसेच शहरातील मान्यवर, माजी सैनिक, विद्यार्थी आणि सामान्य नागरिक यांनी या नेत्रदीपक सोहळ्याचा अनुभव घेतला. सुखोई आणि तेजस विमानांच्या कमी उंचीवरील उड्डाणाने प्रेक्षकांना रोमांचित केले. याव्यतिरिक्त, एनसीसी कॅडेट्स आणि विद्यार्थ्यांना भारतीय हवाई दलाची तेजस, सुखोई आणि राफेल विमाने, तसेच इतर देशांची लढाऊ विमाने पाहण्याची संधी मिळाली.
शूर हवाई योद्ध्यांना पंतप्रधानांच्या शुभेच्छा
भारतीय हवाई दलाच्या स्थापना दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील सर्व हवाई योद्ध्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना मन:पूर्वक शुभेच्छा दिल्या. मातृभूमीच्या रक्षणासाठी तैनात असलेल्या शूर सैनिकांच्या अदम्य धैर्याची, असामान्य शौर्याची आणि अढळ निष्ठेची पंतप्रधानांनी प्रशंसा केली. देशाचे आकाश सुरक्षित ठेवणाऱ्या या शूर सैनिकांचा प्रत्येक भारतीयाला अभिमान आहे, असे ते ‘एक्स’वर म्हणाले.
Comments are closed.