कंटेनरची तीन दुचाकींना धडक; चार ठार, तेरवाड येथे अपघात, तिघे गंभीर जखमी

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

हेरवाडहून कुरुंदवाडच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या कंटेनरने तेरवाड स्टॅण्डजवळ तीन दुचाकींना उडविले. या अपघातात एका महिलेसह दोन पुरुष असे तिघेजण जागीच ठार झाले, तर तेरवाड येथील एका महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या अपघातात अन्य तिघे गंभीर जखमी आहेत. जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कुरुंदवाड पोलिसांनी तातडीने घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला. अपघातानंतर घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

भाऊसाहेब जयपाल गिरमल, अश्विनी भाऊसो गिरमल (रा. अब्दुललाट) या दाम्पत्यासह, मंगल महादेव पाटील (वय ४५, रा. तेरवाड), शकील अन्वर मुलाणी (वय ३७, रा. अर्जुनवाड) अशी मृतांची नावे आहेत.

हेरवाड येथून कंटेनर भरधाव वेगाने कुरुंदवाडच्या दिशेने जात होता. तेरवाड स्टॅण्ड येथे रसवंती गृहाजवळ कंटेनरने पुढे जाणाऱ्या तीन दुचाकींना मागून घडक दिली. त्यानंतर रस्त्याकडेला असणारे लोखंडी बॅरिकेट तोडून १६ चाकी भरधाव कंटेनर शेतात घुसला. कंटेनरने धडक दिल्यानंतर दुचाकीवरील काहीजण रस्त्यावर फेकले गेले. यामध्ये अब्दुललाट येथील भाऊसाहेब गिरमल, अश्विनी गिरमल हे पती-पत्नी आणि अर्जुनवाड येथील तरुण शकील मुलाणी जागीच ठार झाले. तर चार गंभीर जखमींपैकी तेरवाड येथील मंगल पाटील या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अन्य तीन जखमींवर उपचार सुरू आहेत.

अपघातानंतर कंटेनरचालक वाहन घटनास्थळी सोडून फरार झाला. धडकेनंतर कंटेनर रस्त्याकडेला असलेल्या बॅरिकेटला घडकून शेतात जाऊन थांबला. अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना रुग्णालयात हलविण्यासाठी मदत केली.

आरोग्य केंद्रात नातेवाईकांचा ठिय्या; वातावरण तणावपूर्ण

अपघाताची माहिती मिळताच अब्दुललाट आणि परिसरातील ग्रामस्थांनी कुरुंदवाड येथील जिल्हा परिषद आरोग्य केंद्रात धाव घेतली. अपघातानंतर कंटेनरचालक घटनास्थळावरून पसार झाल्याचे समजताच नातेवाईक आणि ग्रामस्थांचा संताप अनावर झाला. जोपर्यंत कंटेनर चालक आणि मालक यांना पोलीस ताब्यात घेऊन कारवाई करत नाही, तोपर्यंत आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाही आणि मृतदेहांचे शवविच्छेदन करू देणार नाही, अशी आक्रमक भूमिका नातेवाईकांनी घेतली आहे. नातेवाईकांनी आरोग्य केंद्राच्या आवारातच ठिय्या आंदोलन सुरू केल्यामुळे तणाव निर्माण झाला आहे. अनुचित प्रकार टाळण्यासाठी रुग्णालयात पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. पोलीस प्रशासनाकडून फरार चालकाचा शोध सुरू करण्यात आला आहे.

Comments are closed.