मीरा रोडमध्ये ईदनंतर नवरात्रीचा वाद; पूनम क्लस्टरमधील १२० कुटुंबीयांची गरबा, दांडियासाठी परवानगीची मागणी
मीरा रोड पूर्वेकडील पूनम इस्टेट क्लस्टर-१ सहकारी गृहनिर्माण संस्थेत बकरी ईदनंतर आता नवरात्रोत्सवाच्या आयोजनावरून वाद निर्माण झाला आहे. १२० कुटुंबीयांनी ११ ते २० ऑक्टोबरदरम्यान इमारतीच्या आवारात गरबा, दांडिया व सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी सोसायटीकडे ना-हरकत प्रमाणपत्राची मागणी केली होती. सोसायटीने परवानगी नाकारल्यानंतर हे प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंत गेले आहे.
पूनम क्लस्टरमध्ये सुमारे ६२५ सदनिका असून विविध धर्मांचे नागरिक वास्तव्यास आहेत. यापूर्वी बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर बकऱ्या आणण्याच्या मुद्यावरून येथे दोन गटांत वाद व हाणामारी झाली होती. त्यामुळे धार्मिक कार्यक्रमांसाठी सर्वांसाठी समान निकष लागू करावेत, अशी मागणी रहिवाशांनी केली होती. दरम्यान सोसायटी कोणत्याही विशिष्ट धर्माच्या सणाला विरोध करत नसून पूर्वीच्या वादाच्या पार्श्वभूमीवर सर्वसाधारण सभेत सामायिक जागेतील कार्यक्रमांबाबत निर्णय घेण्यात आल्याचे पदाधिकारी रूपा पिंटो, दानिश शेख आणि मिनाज शेख यांनी स्पष्ट केले. मात्र काशिमीरा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांनी नवरात्रोत्सवासाठी नियमानुसार परवानगी दिली जाणार असल्याचे सांगितले. त्यामुळे सोसायटीचा ठराव, उपनिबंधकांचे निर्देश आणि पोलिसांची परवानगी यामुळे नवरात्रोत्सवाचा वाद आता कोणत्या मार्गाने सुटतो, याकडे रहिवाशांचे लक्ष लागले आहे.
सर्वसाधारण सभेतील ठरावाचा आधार
२८ सप्टेंबरच्या सर्वसाधारण सभेतील ठरावाचा आधार घेत सोसायटीने परवानगी नाकारली. या निर्णयाला रहिवासी उमाशंकर नाग यांनी आक्षेप घेत सहकारी संस्था विभागाकडे तक्रार केली आहे. रहिवाशांच्या म्हणण्यानुसार यापूर्वी १८ जून रोजी केलेल्या तक्रारीनंतर ठाणे तालुका उपनिबंधक, सहकारी संस्था कार्याल याने २५ जून रोजी कायदा व मंजूर उपविधींनुसार योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश सोसायटीला दिले होते. मात्र त्यानंतरही ठोस कार्यवाही झाली नसल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे.
Comments are closed.