Ratnagiri News – 108 रुग्णवाहिकेच्या डॉक्टरकडून रुग्णाची दिशाभूल; कमिशनसाठी खासगी रुग्णालयात नेल्याचा गंभीर आरोप
शासकीय १०८ रुग्णवाहिकेतील डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे रुग्णाचा जीव धोक्यात घातल्याचा एक अत्यंत गंभीर प्रकार समोर आला आहे. १०८ रुग्णवाहिके वरील एका डॉक्टरने रुग्णाला योग्य वैद्यकीय मदत न देता, तसेच शासकीय जिल्हा रुग्णालयात डॉक्टर उपलब्ध नसल्याची खोटी माहिती देऊन खाजगी रुग्णालयात भरती करण्यास भाग पाडल्याचा खळबळजनक आरोप संगमेश्वर येथील रहिवासी अविनाश राजाराम भाटकर यांनी केला आहे. याप्रकरणी त्यांनी तालुका आरोग्य अधिकाऱ्यांकडे (देवरुख) लेखी तक्रार दाखल करून संबंधित डॉक्टरवर कडक कारवाई व निलंबनाची मागणी केली आहे.
अविनाश भाटकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, २१ ऑगस्ट रोजी रात्री त्यांच्या पत्नीला दमा (अस्थमा) चा तीव्र झटका आल्याने त्यांना तातडीने संगमेश्वर ग्रामीण रुग्णालय येथे नेण्यात आले होते. तेथून पुढील उपचारासाठी रत्नागिरी येथे जाण्याचा सल्ला देण्यात आल्याने त्यांनी १०८ आपत्कालीन रुग्णवाहिका बोलावली. प्रवासादरम्यान १०८ रुग्णवाहिकेतील ड्युटीवर असलेले डॉ. शेख यांनी अत्यंत बेजबाबदार आणि बेकायदेशीर कृत्य केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
रुग्ण अत्यंत गंभीर स्थितीत असताना डॉक्टर मागे रुग्णाजवळ न बसता पुढे ड्रायव्हरच्या बाजूला जाऊन बसले. संगमेश्वर सिव्हिल हॉस्पिटलमधून रुग्ण बाहेर नेताना आणि स्वतःच्या ताब्यात घेताना तिथल्या अधिकृत रजिस्टरवर कोणतीही नोंद केली नाही. रात्री ११ वाजता रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात एकही डॉक्टर भेटणार नाही, अशी पूर्णपणे खोटी माहिती दिली. भीतीचा फायदा घेऊन त्यांनी रुग्णाला बळजबरीने रत्नागिरी येथील ‘परकार हॉस्पिटल’ या खाजगी रुग्णालयात नेण्यास भाग पाडल
खाजगी रुग्णालयात पोहोचल्यानंतर, डॉक्टरने ड्रॉवरमधून खाजगी रुग्णालयाचे अधिकृत रजिस्टर स्वतः काढून त्यात स्वतःच्या हाताने माहिती भरली, जी अत्यंत संशयास्पद बाब आहे.शासकीय जिल्हा रुग्णालय २४ तास आपत्कालीन सेवेसाठी सज्ज असताना केवळ खाजगी रुग्णालयाला आर्थिक फायदा पोहोचवण्यासाठी आणि स्वतःच्या आर्थिक स्वार्थासाठी या डॉक्टरने रुग्णाच्या जिवाशी खेळ केला आहे, असा गंभीर आरोप भाटकर यांनी केला आहे.
जीवनरक्षक मानल्या जाणाऱ्या १०८ सेवेतील हा भ्रष्टाचार आणि निष्काळजीपणा अत्यंत निंदनीय आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची वरिष्ठ स्तरावरून सखोल चौकशी करण्यात यावी आणि २१ ऑगस्टच्या रात्री १०८ रुग्णवाहिकेवर तैनात असलेल्या संबंधित डॉक्टरचा शोध घेऊन त्यांच्यावर कडक कायदेशीर आणि निलंबनाची कारवाई करण्यात यावी, अशी मागणी अविनाश भाटकर यांनी निवेदनाद्वारे केली आहे. या तक्रारीसोबत त्यांनी परकार हॉस्पिटलचे ॲडमिशन पेपर्स व बिलाची झेरॉक्स प्रत पुराव्यादाखल जोडली आहे..
Comments are closed.