परीक्षण – संवेदनशीलतेचं दर्शन

>> सुधाकर वसईकर

कवितेच्या निर्मिती प्रक्रियेबाबत कवयित्री रचना लिहितात, माझ्या हातून थीम कवितेची निर्मिती होईल असे वाटले नव्हते. तब्बल तीन वर्षे अभ्यास केल्यावर पुष्पऋचा अभिव्यक्त होत गेली. रचना यांनी आपल्या अभ्यासाला कल्पनेची जोड देऊन एक-एक ‘पुष्पऋचा’ साकारली आहे. ‘ऋचा’ याचा अर्थ वेदांमधील पवित्र मंत्र असाही होतो.

संग्रहातील 85 कवितांमधून निसर्गाची नानाविध रूपे, झाडं, पानं, पाकळ्या, गंध, काटे आणि मुळे यांच्या नैसर्गिक गुणवैशिष्टय़ांचे मानवीय पातळीवर केलेले कल्पनाविरेचन रसिकांना भुरळ घालणारे आहे. यात स्त्रीसुलभ भावनेचा सुंदर आविष्कार आणि मानवी जीवनमूल्यांचं समग्र दर्शन घडते. कवितेत स्त्राrच्या सौंदर्याची तुलना फुलांशी करण्याची खूप जुनी आणि समृद्ध परंपरा आहे.

तिचे ओठ–गुलाब पाकळ्या; डोळे–कमळासारखे

नाक–चाफेकळी; दात–प्राजक्तासारखे

बांधले–वेलीसारखा…

स्त्रीच्या अवयवांची विविध सुकुमार, नाजूक फुलांशी केलेली तुलना स्त्राrचे सुंदर रूप चित्रित करणारी आहे आणि कविता परिसंहारात कवयित्रीने स्त्राrला फुलांच्या पवित्र, सुंदर, सुवासिक आणि नाजूक जगतात म्हणजे रांगेत नेऊन बसवले आहे. ही कल्पना खूप सुंदर आणि अर्थपूर्ण आहे. स्त्राrचा गौरव करणारी आहे. कवयित्रीने स्त्राr स्वभाव व फुलांची मार्मिक तुलना केली आहे.

फुलांना गरज नसते

कसल्याच सौंदर्यप्रसाधनांची

उलट ते देत राहतात संदेश

साधी राहणी अंगी बाणवण्याची

फुलांचे नैसर्गिक सौंदर्य आणि स्त्रीला कृत्रिम सौंदर्याची असलेली आसक्ती, तसेच सौंदर्य प्रसाधने वापरून नटण्या-मुरडण्याची असलेली आवड यावर मार्मिक भाष्य करून मानवाला ‘साधी राहणी, उच्च विचारसरणी’चा एक मौलिक संदेश दिला आहे. त्याचप्रमाणे निसर्गाची सर्वात सात्त्विक निर्मिती म्हणजे फुल! त्याचे आध्यात्मिक स्वरूप अत्यंत सखोल आणि मानवी जीवनाला मार्गदर्शन करणारे आहे.

जन्माला येऊन देवाच्या पायाशी

समर्पित होणं भाग्यवान समजलं जात

असलं तरी… तोच क्षण जाहीर करतो

दुसऱ्या दिवशी फुलांचं

निर्माल्य होणार असल्याचं!

जीवन जगताना अहंकार न बाळगता प्राप्त परिस्थितीत समर्पित जीवन जगता आले पाहिजे. कारण या दुनियेत कायम असं काहीच नसतं. सगळं काही नश्वर आहे. कवयित्री उपरोक्त ओळींमधून असेही सूचित करतात की, यशाच्या शिखरावर असताना माणसाची परिस्थिती, वेळ बदलू शकते याचे माणसाने भान ठेवले पाहिजे.

फुलं असतात सरळ साधी

लपवाछपवी जमत नाही त्यांना

फळांसारखी

कवयित्रीने या ओळींमध्ये अत्यंत साध्या आणि सोप्या शब्दांत सुंदर विरोधाभास प्रकट केला आहे. फूल आणि फळ यांच्या नैसर्गिक वैशिष्टय़ांचा वापर करून मानवी स्वभावातील सहजता आणि कपटवृत्ती यांवर अप्रत्यक्षपणे भाष्य केले आहे.

माणसाचं जगणं सुगंधित करणारी गुलाब, जाई-जुई, मोगरा, शेवंती, चाफा, चमेली आदी फुलं स्फूर्तिदायक तर आहेतच, पण सौंदर्याची परिपूर्ती करणारी फुलं शब्दांत गुंफून कविताशयरंगाचे तरंग मनात उठवतात. तसेच निसर्गाकडे पाहण्याची एक नवीन दृष्टी बहाल करतात. हरसिंगार, शेफालिका, रागपुष्पी, खरपत्रक, नाईटजास्मिन, सॉरो ऑफ ट्री आदी प्राजक्त फुलाची नवीन नावं कवितेतून कळत जाऊन प्राजक्त आणखी नव्याने आकळत जातो.

फुलं संवेदनशील असतात. त्यांना माणसांविषयी काय वाटते. ते काय विचार करत असतील? असाही विचार काही कवितांमधून कवितेतून पाझरत राहातो. फुलं निष्पाप, निस्वार्थी असतात. म्हणूनच कवयित्री पुढील ओळीत म्हणते.

अजूनही व्यावहारिक जगणं

फुलांना जमलं नाही आणि

फुलांनी त्यांचा भाग

माणसाला मागितलेला नाही

आजच्या धावपळीच्या जगात मानवाची बधिर होत चाललेली संवेदनशीलतेला जागृत करण्याचं काम या कविता करतात. संग्रहभर फुलांशी संवाद साधत कवयित्री वाचकांशी बोलत राहते. कवितांना अनुक्रमांक दिले असल्यामुळे वाचत जाताना फुलांची दीर्घ कविताच आपल्या पुढय़ात येऊन उभी ठाकल्याचा भास होत राहतो. निसर्गाकडे पाहण्याची नवी दृष्टी बहाल करणाऱ्या कवितेत निसर्गाची विविध रूपे रेखाटली असून मानवी मनाचे विविध पदर अलगद, हळुवार तरलतेने उलगडत जातात. जीवनविषयक तत्त्वचिंतन करणाऱ्या कविता मुळातून वाचल्या पाहिजेत. फुलासारखं आनंदी जगावं असा सकारात्मक संदेश देणाऱ्या या कविता संग्रही हव्यात.

पुष्पऋचा

कवीची रचना

प्रकाशक: साहित्यक्षरा

पृष्ठ 120, किंमत: 250/-

Comments are closed.