गरब्यासाठी व्हिटॅमिन इंजेक्शन

आज रविवारपासून नवरात्रपर्वाचा शुभांरभ होत आहे. गुजरात आणि भारताच्या इतर अनेक भागांमध्ये नवरात्रकाळात ‘गरबा‘ खेळण्याची प्रथा आहे. गरब्याची परंपरा प्रचीन काळापासून आहे. अलिकडच्या काळात त्याचे स्वरुप काहीसे परिवर्तीत झाले असले, तरी ही प्रथा परंपरागत उत्साहाने पाळली जाते. तथापि, गरबा खेळण्याचा उत्साह अनेक तास टिकून रहावा, यासाठी तरुण-तरुणी व्हिटॅमिनचे इंजेक्शन घेत आहेत, असे आढळून आले असून अशा प्रकारची इंजेक्शने प्रकृतीला हानीकारक ठरु शकतात. त्यामुळे वैद्यकीय विचारविमर्श केल्याखेरीज अशी इंजेक्शने घेऊ नयेत असा इशारा अनेक डॉक्टरांनी दिला आहे.

व्हिटॅमिन सी आणि ग्लुटाथियोन यांचे मिश्रण असणारी ही इंजेक्शने सलाईन ज्या पद्धतीने लावली जाते, त्या पद्धतीने थेट रक्तात सोडली जातात. यामुळे उत्साह बराच काळा टिकून राहतो, असा दावा केला जातो. तसेच त्वचेचा चमकदार रहण्यासाठीही या द्रव्यांचा उपयोग होतो, असे प्रतिपादन केले जाते. ही सवय केवळ तरुणांनाच लागली आहे, असे नाही. तर 30 ते 50 वयोगटातील लोकही या इंजेक्शन्सचा उपयोग करीत आहेत. या इंजेक्शन्सची किंमतही मोठी आहे. साधारणत: 15 हजार रुपयांना एक असा त्यांचा दर आहे. त्यामुळे श्रीमंत असलेल्यांनाच ती घेणे शक्य आहे. विशेषत: अहमदाबादमध्ये हा ट्रेंड जास्त विस्तारला आहे. त्यामुळे अनेक क्लिनिक्समध्येही ही इंजेक्शने दिली जातात, असे दिसून येते. डॉक्टरांनी या इंजेक्शन्ससंदर्भात सावधानतेचा इशारा देताना त्यांचा अतिउपयोग शरीरासाठी अत्यंत हानीकारक ठरु शकते, असे स्पष्ट करत लोकांना सावध करण्याचा प्रयत्न चालविला आहे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार या मिश्रणाची इंजेक्शन्स वैद्यकीय उपचारांचा भाग म्हणून दिली जातात. रुणांना शक्ती येण्यासाठी किंवा दीर्घकाळच्या आजारानंतर आलेला अशक्तपणा लवकर जावा म्हणून ती दिली जातात. ती निरोगी व्यक्तींनी घ्यायची नसतात. अशा प्रकारे कृत्रिम पद्धतीने शारिरीक शक्ती टिकवून धरण्याचा प्रयत्न हानीकारक असतो. त्यामुळे डॉक्टरांशी चर्चा करुनच, यांच्या सूचनांच्या अनुसार या इंजेक्शन्सची मात्रा किती असावी, याचा निर्णय घ्यावा. स्वत:च्या निर्णयानुसार असे करु नये, अशी सूचना आहे.

Comments are closed.