माछारवरील हल्ल्याचा तपासही भारत करत आहे
एनआयएने सादर केला युएपीएअंतर्गत एफआयआर
► वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतीय वैमानिक स्मित मच्छार यांच्यावर फ्लायदुबई विमानात ओमानी सह वैमानिक हमाम अल् हमामी यांने केलेल्या जीवघेण्या दहशतवादी हल्ल्याचा तपास भारतही करणार आहे. सध्या हा दहशतवादी हमामी सौदी अरेबियाच्या ताब्यात आहे. त्याची चौकशी संयुक्त अरब अमिरातीकडूनही केली जात आहे. भारताच्या वैमानिकावर हा दहशतवादी हल्ला करण्यात आल्याने भारतानेही या संदर्भात अपहरणविरोधी कायदा आणि युएपीए यांच्या अंतर्गत चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे. ही चौकशी राष्ट्रीय अन्वेषण प्राधिकारणाकडून केली जाणार आहे.
फ्लायदुबई विमान ताब्यात घेऊन नंतर ते इस्रायलमधील महत्वाच्या आस्थापनावर आदळविण्याची हमामी याची योजना होती. त्यामुळे विमान इस्रायलजवळ पोहचल्यानंतर त्याने कुऱ्हाडीने स्मित मच्छार यांच्यावर जोरदार हल्ला केला. तसेच त्यांना भोसकले. मात्र, तशा रक्तबंबाळ अवस्थेतही मच्छार यांनी धीर न सोडता आणि प्रसंगावधान राखून विमान नियंत्रणात आणले आणि कॉकपिटचा दरवाजा उघडला. त्यामुळे विमानाचे कर्मचारी आणि काही प्रवासी आत जाऊ शकले. त्यांनी हल्लेखोर दहशतवादी वैमानिकाला दाबून धरले आणि प्रवाशांपैकी एका डॉक्टरांनी मच्छार यांच्या तातडीने प्रथमोपचार करुन त्यांना विमान सुरक्षितपणे उतरेपर्यंत त्यांचा रक्तस्त्राव नियंत्रणात ठेवला. त्यामुळे मच्छार बेशुद्ध पडले नाहीत. मच्छार यांच्या कवटीला मोठी दुखापत झाली आहे. त्यांच्यावर तातडीची शस्त्रक्रियाही संयुक्त अरब अमिरातीत झाली आहे. सध्या त्यांची प्रकृती सुधारत असल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मच्छार यांच्याशी प्रत्यक्ष संपर्क केला असून त्यांचे त्यांच्या धैर्यासाठी अभिनंदन केले आहे.
भारताच्या बदनामीचा कट ?
भारताच्या मुख्य वैमानिकावर हल्ला करुन विमान आदळविण्यात आले असते, तर दहशतवादी हल्ला केल्याचा आरोप प्रथमदर्शनी भारतीय वैमानिकावर करण्यात आला असता. कारण ते मुख्य वैमानिक असल्याने विमान त्यांच्या नियंत्रणात होते. त्यांच्यावर हल्ला झाला आहे, ही बाब त्यांनी कॉकपिटचा दरवाजा उघडल्याने सर्वांना समजली. विमान लक्ष्यावर आदळविण्यात आले असते, तर त्यातील सर्वजण जळून खाक झाले असते. त्या स्थितीत विमान नेमके कोणी आदळविले हे समजू शकले नसते किंवा समजण्यासाठी बराच उशीर लागला असता. त्यामुळे प्रथम संशय भारतीय वैमानिकावरच येऊन पुन्हा एकदा ‘हिंदू दहशतवादा’चे भूत उभे करण्यात असते. पाकिस्तानसारख्या भारतविरोधी आणि हिंदूविरोधी देशाने याचा लाभ उठवून भारताची बदनामी करण्याची संधी साधली असती, असेही आरोप केले जात आहेत. त्यामुळे हा हल्ला नेमका कोणत्या उद्देशाने करण्यात आला, याची चौकशी भारताकडूनही केली जाणे आवश्यक आहे, असे अनेक तज्ञांचे मत आहे. आता भारतानेही ही चौकशी करण्याचा अत्यंत योग्य निर्णय घेतला आहे.
9 ऑक्टोबरला एफआयआर
राष्ट्रीय अन्वेषण प्राधिकारणाने (एनआयए) या प्रकरणी 9 ऑक्टोबरला एफआयआर सादर केला आहे. हल्लेखोर दहशतवादी वैमानिकाची चौकशी केली जाणार आहे. या चौकशीतून भारताविरोधात किंवा हिंदू समाजाविरोधात काही कारस्थान शिजले होते काय, याचाही शोध लागण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
Comments are closed.