सीजेपींचा निषेध, पोलिसांची कारवाई
अभिजित दीपके, केजरीवाल यांच्यासह बडे नेते ताब्यात : आजही निदर्शने करण्याचा इशारा
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी ‘सीजेपी’ने पुकारलेल्या आंदोलनादरम्यान पोलिसांनी 3,000 हून अधिक लोकांना ताब्यात घेत मोठी कारवाई केली आहे. राजधानी दिल्लीच्या विविध भागांमध्ये आंदोलन करण्यासाठी सीजेपी आणि इतर पक्षाचे ‘जेन-झी’ कार्यकर्ते सकाळपासूनच जंतर मंतरच्या दिशने जमण्यास सुरुवात झाली होती. मात्र, आंदोलनादरम्यान कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई सुरू केली. तरुणांसह बड्या नेत्यांना ताब्यात घेत आंदोलन रोखण्याचा प्रयत्न केला असला तरी सीजेपीने रविवारीही हे आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा दिला आहे.
‘कॉक्रोच जनता पार्टी’च्या (सीजेपी) प्रस्तावित आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती. जंतर मंतरकडे जाणाऱ्या रस्त्यांवर बॅरिकेड्स लावण्यात आले होते आणि पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला होता. सीजेपीचे संस्थापक अभिजीत दीपके यांच्यासह पक्षाच्या काही नेत्यांना दिल्लीत आगमन होताच विमानातूनच ताब्यात घेण्यात आले. सीजेपीच्या प्रस्तावित आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली होती. जंतर मंतरच्या परिसरात पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले होते आणि प्रवेश प्रतिबंधित करण्यात आला होता. जंतर मंतर, जनपथ, निवडणूक आयोग आणि दिल्ली पोलीस मुख्यालय परिसरात कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली होती. येणाऱ्या मार्गांवर बॅरिकेड्सचे सात थर उभारण्यात आले होते, तर नवी दिल्ली जिह्याची 20 हून अधिक झोनमध्ये विभागणी करण्यात आली होती.
सीजेपीने आंदोलनाची घोषणा केल्यामुळे दिल्लीत हाय अलर्ट जारी करण्यात आला होता. या आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी दिलेली नाही. शुक्रवारपासून राजधानीच्या सर्व सीमांवर पोलिसांची तपासणी सुरू होती. सीजेपीच्या आंदोलनापूर्वी जंतर मंतर येथे काही आंदोलकांना ताब्यात घेण्यात आले. दिल्लीतील 45 मेट्रो स्टेशन्स बंद करण्यात आली असून, बऱ्याच ठिकाणी इंटरनेट सेवा निलंबित करण्यात आली. सावधानतेचे उपाय म्हणून दिल्ली पोलिसांनी प्रत्येक चौकात नाकाबंदी केली. दिल्ली पोलिसांनी शनिवारी अनेक प्रमुख मार्गांवर वाहतूक वळवण्याची घोषणा केली.
केजरीवाल, ममतांवर कारवाई
दिल्लीतील जंतर मंतरकडे जात असताना पोलिसांनी माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि ममता बॅनर्जी यांना ताब्यात घेतले. जंतर मंतर, कनॉट प्लेस आणि मिंटो ब्रिजसह विविध भागांतून आतापर्यंत 1,000 हून अधिक आंदोलकांना ताब्यात घेण्यात आले आहे. आंदोलकांनी बॅरिकेड्सही तोडल्यामुळे पोलिसांनी त्यांना पांगवून कारवाई केली. आंदोलनादरम्यान एका आंदोलकाच्या डोक्याला दुखापत झाली. इम्तियाज अली मार्गावरील आकाशवाणी भवनजवळ आंदोलकांनी बॅरिकेड्स ओलांडून पोलिसांवर दगडफेक केल्याने दोन पोलीस जखमी झाले. यापूर्वी, सीजेपीचे संस्थापक अभिजीत दीपके यांना मुंबईहून दिल्लीला येणाऱ्या विमानातून ताब्यात घेण्यात आले होते. त्यांच्यासोबत सीजेपी नेते सौरभ दास आणि आशुतोष रांका यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले. यानंतर, दीपके यांनी आता अजिंक्य शिंदे या आंदोलनाचे नेतृत्व करतील, असे जाहीर केले.
नेत्यांची रवानगी वेगवेगळ्या ठिकाणी
सीजेपीचे संस्थापक अभिजीत दीपके, सह-संयोजक सौरभ दास आणि प्रवक्ते आशुतोष रांका यांना दिल्ली पोलिसांनी त्यांच्या विमानातून ताब्यात घेतले. सीजेपीचे आंदोलन रोखण्यासाठी दिल्ली पोलिसांनी या तिघांना वेगवेगळे ठेवण्याची नामी शक्कल लढवली. दिल्ली पोलिसांनी तिन्ही व्यक्तींना विलगीकरणात ठेवण्याची योजना आखली आहे. अभिजीत दीपके यांना गुरुग्रामला आणि सौरभ दास यांना दिल्लीला नेण्यात आले आहे, तर पोलिसांनी आशुतोष रांका यांना द्वारका येथे नेले आहे.
दिल्लीतील रस्त्यांवर नाकेबंदी
मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात जंतर मंतर येथे सीजेपीने प्रस्तावित केलेले आंदोलन रोखण्यासाठी सुरक्षा दलांच्या तैनातीमुळे शनिवारी मध्य दिल्लीतील अनेक भाग बंद करण्यात आले होते. दिल्ली वाहतूक पोलिसांनी वाहतुकीची अद्ययावत माहिती ट्विट केली. आंदोलनाच्या ठिकाणी जाण्राया अनेक प्रमुख मार्गांवर वाहन तपासणीमुळे वाहतूक विस्कळीत झाल्याने वेग मंदावला होता. दिल्लीभर बॅरिकेड्स आणि कडक निगराणीमुळे मध्य दिल्लीतील अनेक भागांमध्ये वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
रेल्वे स्थानकावर ड्रोनद्वारे पाळत
जंतर मंतर येथे होणाऱ्या सीजेपीच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर ड्रोनद्वारे पाळत ठेवण्यात आली होती. स्टेशनवर दिल्ली पोलीस आणि आरएएफचे जवान तैनात करून कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. पोलीस कर्मचारी सुरक्षा संचलन करत असून परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी ड्रोनचा वापर करत आहेत. सीजेपीच्या आंदोलनामुळे हजरत निजामुद्दीन रेल्वे स्टेशनवर कडक सुरक्षा व्यवस्थेत प्रवासी वाहतूक सुरू आहे.
तीन माजी मुख्यमंत्र्यांसह अनेक प्रमुख नेते ताब्यात
अभिजीत दीपके, ममता बॅनर्जी, पिनारयी विजयन, अरविंद केजरीवाल, मनीष सिसोसिया, संजय सिंग, डेरेक ओब्रायन, एम. ए. बेबी, गोपाल राय, ध्रुव राठी, सौरव दास, आशुतोष रांका, नेहा बोरा
दिवसभरातील ठळक घडामोडी
पहाटे 5:00 वा. – जंतर मंतर व आजूबाजूच्या परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात. रस्त्यांवर बॅरिकेड्स उभारले.
सकाळी 7:00 वा. – सीजेपीचे संस्थापक अभिजीत दीपके दिल्लीतील आंदोलनात सहभागी होण्यासाठी मुंबईहून रवाना.
सकाळी 7:45 वा. – पोलिसांनी विनाकारण फिरणाऱ्या किंवा आंदोलनात जाणाऱ्या लोकांना ताब्यात घेण्यास सुरुवात केली.
सकाळी 8:30 वा. – पोलिसांनी अश्रुधूर वाहनांचा वापर करत जंतर मंतरच्या परिसरातील काही आंदोलकांना हटवले.
सकाळी 10:50 वा. – दिल्लीला पोहोचल्यानंतर अभिजीत दीपकेंसह सीजेपीच्या तिन्ही नेत्यांना विमानातच ताब्यात घेण्यात आले.
सकाळी 11:30 वा. – जंतर मंतरच्या दिशेने जाणाऱ्या 60 हून अधिक आंदोलकांना बंगला साहिब गुरुद्वाराजवळ ताब्यात घेतले.
दुपारी 1:05 वा. – अभिजीत दीपके यांचा व्हिडिओ व्हायरल. आता आंदोलनाचे नेतृत्व अजिंक्य शिंदे यांच्याकडे देण्याची घोषणा.
दुपारी 2:00 वा. – ममता बॅनर्जी यांना इतर दोन माजी मुख्यमंत्र्यांसह जंतर मंतरकडे जात असताना ताब्यात घेण्यात आले.
दुपारी 3:00 – अरविंद केजरीवाल यांना त्यांच्या घराबाहेर ताब्यात घेतले. नेहा बोरा यांच्यासह डाव्या विचारसरणीच्या अनेक नेत्यांनाही पकडले.
Comments are closed.