सर्वपित्रीला बाणगंगा प्रदूषणमुक्त; पालिका प्रशासन आणि स्थानिकांच्या प्रयत्नांना यश
दक्षिण मुंबईतील ऐतिहासिक बाणगंगा तलावात शनिवारी, सर्वपित्रीला मृत माशांचा खच आणि निर्माल्याचा ढीग असे दृश्य दिसले नाही. यंदा प्रथमच बाणगंगेने प्रदूषणमुक्तीचा श्वास घेतल्याचे दिसून आले. स्थानिक नागरिक, पूजाविधी करणारे पंडित आणि पालिका प्रशासन यांनी घेतलेल्या सामूहिक प्रयत्नांतून बाणगंगा स्वच्छ ठेवण्याच्या प्रयत्नांना यश आल्याचे दिसून आले.
दरवर्षी सर्वपित्री अमावास्येला बाणगंगा तलावाच्या काठावर मोठय़ा प्रमाणात पिंडदान विधी होतो. पिंडदानाचे साहित्य, तेल, अबीर-गुलाल, निर्माल्य आदीमुळे बाणगंगा दूषित होते. यंदा पितृपंधरवड्याच्या सुरुवातीलाच बाणगंगेतील मासे मरायला सुरुवात झाली होती. या पार्श्वभूमीवर पर्यावरणप्रेमी आणि स्थानिकांनी संताप व्यक्त केल्यानंतर पालिका प्रशासनाने काही उपाययोजना हाती घेतल्या. सर्वपित्रीच्या पार्श्वभूमीवर बाणगंगेच्या चारही बाजूला बॅरिकेडिंग करण्यात आले होते, जेणेकरून कुणीही तलावात विधीसाठी उतरू नये. त्यामुळे आज सर्वपित्रीला थेट बाणगंगेच्या तलावात थेट कोणतेही विधी झाले नाहीत.
बाणगंगेशी जोडलेल्या भाविकांच्या श्रद्धा लक्षात घेऊन पालिकेने खबरदारी घेतली होती. बाणगंगेच्या पवित्र पाण्यात स्नान करण्यापासून कुणी वंचित राहू नये यासाठी 35 ठिकाणी पाण्याचे पाईप (आऊटलेट्स) लावून व्यवस्था करण्यात आली होती.
पिंडदान विधींसाठी दहा मोठे तर पाच लहान कृत्रिम तळे उभारण्यात आले होते. आज बाणगंगेच्या तीरी आलेल्या हजारो लोकांनी कृत्रिम तळय़ांना प्राधान्य देऊन त्यात पूजाविधी केले. त्यामुळे बाणगंगा प्रदूषित झाली नाही. दिवसभरात पालिकेच्या कर्मचाऱयांनी कृत्रिम तळय़ांतून मोठय़ा प्रमाणात कचरा गोळा केला, अशी माहिती ‘डी’ विभागाचे सहाय्यक आयुक्त संतोष साळुंखे यांनी दिली.
पंडित आणि स्थानिकांची मोठी भूमिका
बाणगंगेच्या वाढत्या प्रदूषणाबद्दल पर्यावरणप्रेमी आणि स्थानिक रहिवासी नेहमी चिंता व्यक्त करतात. यंदा पितृपंधरवडय़ात महापालिका अधिकाऱयांनी बाणगंगा परिसरात पूजाविधी करणाऱया 30- 40 पंडितांची आणि स्थानिक रहिवाशांनी एक बैठक घेतली. बाणगंगेचे प्रदूषण रोखण्यासाठी पूर्णपणे सहकार्य करण्यास आणि तसा संदेश लोकांपर्यंत पोहचवण्यास सर्व पंडितांनी तयारी दर्शवली. त्याचा प्रत्यय सर्वपित्रीच्या दिवशी दिसून आला.
Comments are closed.