मस्जिद बंदर रेल्वे स्थानकातील पूल तातडीने दुरुस्त करून खुले करा; शिवसेनेची रेल्वेकडे मागणी

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

मस्जिद बंदर रेल्वे स्थानकातील दोन पूल सुरक्षेच्या कारणास्तव बंद केले आहेत. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत असून स्थानकातील उर्वरित एकमेव पुलावर गर्दीचा ताण येत आहे. संभाव्य चेंगराचेंगरीची दुर्घटना टाळण्यासाठी बंद असलेल्या दोन्ही पुलांची तातडीने दुरुस्ती करून ते प्रवाशांसाठी खुले करावेत, अशी मागणी शिवसेनेने मध्य रेल्वे प्रशासनाकडे केली. त्यावर अधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.

शिवसेना नेते–खासदार अरविंद सावंत यांच्या सूचनेनुसार आणि दक्षिण मुंबईचे विभागप्रमुख संतोष शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार शिवसेना उपनेते तथा रेल्वे कामगार सेनेचे दिवाकर देव यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मध्य रेल्वे प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी (डीसीएम) प्रकाश कनोजिया यांची भेट घेत प्रवाशांच्या गैरसोयीबाबत चर्चा केली. शिष्टमंडळात मांडवी शाखाप्रमुख स्वप्नील कोळी, सिनेट सदस्य किसन सावंत, विधानसभा प्रमुख विकास मयेकर यांच्यासमवेत दीपक चव्हाण, अनिल गोटुगडे, प्रमोद बेंडे, गुलाब उग्रेज, सुखी जवेरी, वैभव साने, प्रेषित सांबळे, पूर्वा कोळी, सुभाष दाभाडे, रेल्वे कामगार सेनेचे योगेश जाधव, नरेंद्र तळेकर, स्वप्नील झेमसे, दत्ता राव यांचा समावेश होता.

मस्जिद बंदर रेल्वे स्थानकात व्यापारी तसेच प्रवाशांची मोठी वर्दळ असते. येथील दोन पूल धोकादायक स्थितीत असल्याचे सांगून बंद केले आहेत, तर कल्याणच्या दिशेकडील केवळ एक पूल प्रवाशांना ये-जा करण्यासाठी खुला आहे. या पुलावर गर्दीचा ताण येत असल्यामुळे बंद केलेल्या पुलांची तातडीने दुरुस्ती करून ते खुले करावेत, अशी मागणी शिष्टमंडळाने केली. त्यावर मागण्या पूर्ण करण्याबाबत रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.

Comments are closed.