अमिताभ @ 84; वाढदिवशी चाहत्यांकडून ‘जलसा’
बॉलीवूडचे महानायक ‘बिग बी’ अमिताभ बच्चन यांनी रविवारी आपला 84 वा वाढदिवस साजरा केला. अमिताभ यांच्या चाहत्यांसाठी हा मोठा दिवस. ‘आज खुश तो बहुत होंगे तुम’ अशीच त्यांच्या चाहत्यांची अवस्था होती. चाहत्यांनी बिग बींच्या ‘जलसा’ बंगल्याबाहेर रात्रीपासूनच मोठी गर्दी केली होती. दूरदूरहून आलेले चाहते आपल्यासोबत केक, मिठाई आणि पोस्टर घेऊन आले होते. अमिताभ यांनी बंगल्याबाहेर येऊन रविवारी चाहत्यांना दर्शन दिले. हात उंचावून अभिवादन केले.
वयाचा आकडा हा तुमच्या-माझ्यासारख्या सामान्य माणसाला कार्यापासून परावृत्त करू शकतो, पण ‘सदी का महानायक’ अशी उपाधी मिळालेला शहेनशहा त्याला अपवाद असतो. म्हणूनच आजही अमिताभ बच्चन नावाचा करिष्मा मनोरंजनसृष्टीत चालताना दिसतो. हा अभिनय सम्राट आपल्याला अभिनयाने आजही थक्क करतोय. बिग बी यांचा मोठा फॅन क्लब आहे. रात्री 12 वाजताच ‘जलसा’बाहेर चाहत्यांनी अमिताभ बच्चन यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. चाहत्यांनी त्यांचे पोस्टर हातात घेऊन घोषणा दिल्या आणि त्यांच्या दीर्घायुष्यासह उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना केली. या वेळी लोकांनी एकमेकांना मिठाई भरवली आणि अनेक चाहते ढोल-ताशांच्या तालावर नाचताना दिसले.
हुबेहुब बिग बींसारख्या दिसणाऱया एका व्यक्तीने या जल्लोषात रंग भरले. त्याने अमिताभ यांच्यासारखा डान्स करून आणि डायलॉग उच्चारून आनंद साजरा केला. अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी त्यांच्या घराबाहेर चाहत्यांची गर्दी जमते. उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, गुजरात आणि देशाच्या इतर भागांतून चाहते मुंबईत पोहोचतात.
Comments are closed.