खराब इंजिन ऑईलपासून इंधननिर्मिती, आयसीटीच्या प्राध्यापक-विद्यार्थ्यांचे संशोधन
रसायनशास्त्र संस्थेच्या (आयसीटी) प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी संशोधन करत खराब इंजिन ऑईलपासून इंधन तयार करण्याचा शोध लावला आहे. या संशोधनामुळे हवा व जमिनीचे प्रदूषण टळणार आहे. ‘आयसीटी’मधील बायोटेक्नॉलॉजी विभागात प्राध्यापक डॉ. हितेश पवार यांनी योगेश बडगुजर, नंदिनी आजगावकर, स्वप्नील निकम, डॉ. अमोल वाघमोडे, शेहबाज अन्सारी या विद्यार्थ्यांसोबत संशोधन करत हा शोध लावला आहे.
दुचाकी, ट्रकपासून ते मोठमोठय़ा जहाजांपर्यंत तसेच सर्व इंधनावर चालणाऱया सर्व यंत्रांमध्ये घर्षण टाळण्यासाठी वापरले जाणारे तेल कालांतराने खराब होते. सरकारकडे असलेल्या नोंदीनुसार दरवर्षी 13 ते 14 लाख लिटर खराब तेल जमा होते. या तेलावर प्रक्रिया करण्यासाठी प्रचलित असलेल्या दोन पद्धतींमध्ये प्रचंड ऊर्जा लागते आणि हाती येणाऱया स्वच्छ तेलाचे प्रमाण मूळ तेलापेक्षा खूपच कमी असते. त्यामुळे कमी ऊर्जा आणि कमी घट होईल, अशी पद्धत विकसित करण्याचे आव्हान होते. त्यासाठी संशोधकांनी एक उप्रेरक घटक (कॅटलिस्ट) शोधला. खराब तेलात हा उप्रेरक टाकून ते 350 अंश सेल्सिअसपर्यंत गरम केले जाते. त्यातून मिळणारा घटक हा कार्बनरहित असतो. परिणामी हे इंधन जनरेटर किंवा छोटी यंत्रे चालवण्यासाठी वापरले जाऊ शकते, असे डॉ. पवार यांनी सांगितले.
प्रदूषण कमी होणार
खराब तेल नष्ट करण्यासाठी एक तर ते जाळून टाकले जाते किंवा जमिनीवर फेकले जाते. मात्र या तेलातील घातक वायू व रसायने हवा आणि मातीत मिसळल्यामुळे प्रदूषण होते. या इंजिन ऑईलची समस्या समोर आल्यावर डॉ. हितेश पवार व त्यांच्या विद्यार्थ्यांनी या संशोधनाला सुरुवात केली. या संशोधनामुळे प्रदूषण कमी होण्यास मदत होणार आहे. या इंधनावर आणखी एक प्रक्रिया करून पेट्रोल-डिझेलला पर्यायी इंधनही आम्ही तयार केले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. डॉ. पवार यांनी या आधी प्लॅस्टिकच्या कचऱयापासून इंधननिर्मितीचा प्रयोग यशस्वी करून दाखवला आहे.
Comments are closed.