इंडिगोचे पॅसेंजर फ्लाइट हैदराबादकडे वळवण्यात आले.

विमानातील इलेक्ट्रॉनिक साधनाला लागली आग

वृत्तसंस्था, चेन्नई

दिल्लीहून चेन्नईला जाणारे इंडिगो कंपनीचे प्रवासी विमान अर्ध्या वाटेतून हैद्राबाद येथे वळविण्यात आले आहे. या विमानातून प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाकडे असलेल्या इलेक्ट्रॉनिक साधनांला आग लागल्याने दक्षतेचा उपाय म्हणून विमान अर्ध्याहून अधिक प्रवास झाल्यानंतर हैद्राबादकडे वळविण्यात आले. हैद्राबादच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमान सुखरुप उतरविण्यात आल्याने प्रवाशांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. प्रवासी विमान वळवावे लागल्याची ही गेल्या दोन महिन्यांमधील सहावी घटना आहे. उतरविल्यानंतर विमानची तपासणी झाली.

हैद्राबादच्या विमानतळावर विमान उतरविण्यात आल्यानंतर त्वरित सर्व प्रवाशांना विमानातून बाहेर काढण्यात आले. ज्या प्रवाशाच्या साधनाला आग लागली होती, ते साधन जप्त करण्यात आले आहे. त्याची तपासणी होणार आहे. या प्रवाशाचीही चौकशी केली जाण्याची शक्यता आहे. झालेल्या घटनेसंबंधी विमान कंपनीने वक्तव्य दिले असून त्यात घडलेल्या प्रसंगाविषयी माहिती देण्यात आली आहे.

नेमके काय घडले…

दिल्लीहून विमानाने चेन्नईच्या दिशेने उ•ाण केल्यानंतर काही काळ विमानाचा प्रवास सुरळीत झाला. निम्म्याहून अधिक प्रवास झाल्यानंतर अचानक केबिनमधील एका खासगी प्रवाशाकडे असणाऱ्या एका इलेक्ट्रॉनिक वस्तूतून ज्वाळा येऊ लागल्या. त्यामुळे विमानातील अलार्म वाजू लागला. विमानातील कर्मचारी वर्गाने सर्व प्रवाशांना सावध केले. तसेच नियंत्रण कक्षाला ही माहिती कळविण्यात आली. सुरक्षेचा उपाय म्हणून विमान जवळच्या हैद्राबाद आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे काही काळ प्रवाशांची घबराट झाली.

अन्य विमानाने प्रवाशांना पाठविले

विमान हैद्राबादच्या विमानतळावर उतरविल्यानंतर प्रवाशांच्या चेन्नई प्रवासाची व्यवस्था पुढच्या विमानांमधून करण्यात आली आहे. इलेक्ट्रॉनिक साधनाला आग कशी लागली, याची तपासणी केली जात आहे. प्रवाशांच्या गैरसोयीमुळे विमान कंपनीने क्षमायाचना करणारे वक्तव्य प्रसिद्ध केले आहे. खासगी प्रवाशाच्या साधनाला आग लागल्याने विमान उतरविण्याचा प्रकार दुर्मिळ असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले आहे. या प्रसंगाच्या चौकशीचा आदेश देण्यात आला आहे.

Comments are closed.