पाठलागाने श्वास रोखला , हिंदुस्थानचा विंडीजवर 14 धावांनी विजय; अभिषेक-अर्शदीपच्या झंझावातामुळे आघाडी
अभिषेक शर्मा नावाच्या वादळाने इंदूरच्या होळकर स्टेडियमवर चौकार-षटकारांची आतषबाजी करत वेस्ट इंडीजसमोर 224 धावांचे जबरदस्त आव्हान ठेवले होते. आज शे होप लवकर बाद झाल्यामुळे विंडीज पिछाडीवर होता, मात्र अखेरच्या क्षणी शमार स्प्रिंगरने केलेल्या 4 षटकारांच्या झंझावाताने हिंदुस्थानी क्रिकेटप्रेमींचे श्वास रोखले होते. त्यातच अर्शदीपने एकाच षटकात दोन विकेट घेत सामना आणखी रंगतदार केला. अखेर 6 चेंडूंत 37 धावांची गरज असताना स्प्रिंगरने 22 धावा चोपून सामन्यात जीव ओतला, पण त्याचे प्रयत्न 14 धावांनी कमी पडले आणि हिंदुस्थानने दुसऱया विजयासह मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली. 44 धावांत 3 विकेट टिपणारा अर्शदीप सिंग विजयाचा मानकरी ठरला.
रांचीत झालेल्या सामन्यात हिंदुस्थानला 250 धावांचे आव्हान उभारल्यानंतरही पराभवाचा जबर धक्का बसला होता. त्यामुळे आजच्या लढतीतही विंडीजकडून त्याच खेळाची अपेक्षा होती. हिंदुस्थानच्या 224 धावांचा पाठलाग करताना कर्णधार शे होपला 5 धावांवरच त्रिफळाचीत करून अर्शदीपने सनसनाटी निर्माण केली. मात्र त्यानंतर कामिल पूरन (42) आणि शिमरॉन हेटमायर (43) यांनी फटकेबाजी करून संघात जोश आणला. मग शेरफन रदरफर्ड आणि क्वेंटिन सॅम्पसन यांनी वेगवान खेळय़ा करत आपला पाठलाग कायम ठेवला.
स्प्रिंगरने सामन्यात जान आणली
विजयाचे आव्हान खडतर होत असले तरी विंडीज शर्यतीत होता. 3 षटकांत 56 धावांची गरज असताना अर्शदीपने रदरफर्ड आणि किमो पॉलचा बाद करून विंडीजच्या पाठलागला ब्रेक लावला. मग 19 व्या षटकात प्रिन्स यादवने 11 धावा दिल्यामुळे विंडीज विजयापासून काहीसा लांब गेला असा वाटला. त्यांनी 6 चेंडूंत 6 षटकारांची गरज होती. तेव्हा स्प्रिंगरने पहिल्याच चेंडूवर षटकार खेचला, पण अक्षर पटेलने दुसरा चेंडू निर्धाव घालत हिंदुस्थानला विजयाच्या रेषेत आणले. मग पुढे स्प्रिंगरने 4, 6, 6 फटके मारत विजयाचे अंतर कमी केले. त्याने 11 चेंडूंत 35 धावा ठोकल्या. अक्षरने एकही अवांतर चेंडू न फेकल्यामुळे हिंदुस्थानने विजयावर शिक्का मारला.
अभिषेकचा तुफानी हल्ला
त्याआधी संजू सॅमसन अवघ्या तीन धावांवर बाद झाल्यानंतर अभिषेक आणि इशान किशन यांनी विंडीजच्या गोलंदाजांना फोडून काढले. दोघांनी दुसऱया विकेटसाठी 108 धावांची भागीदारी करत धावफलक वेगाने हलता ठेवला. इशानने 18 चेंडूंत 37 धावा केल्या, तर अभिषेकने अवघ्या 18 चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. दोघांनी 6 षटकांतच 108 धावांची भागी रचली, पण ही जोडी फुटताच हिंदुस्थानच्या डावाला ग्रहण लागले आणि 1 बाद 117 वरून 5 बाद 135 अशी घसरगुंडी उडाली. श्रेयस अय्यर (1) आणि नमन धीर (8) लवकर बाद झाले. अभिषेकने आपल्या 69 धावांच्या खेळीत 5 षटकार आणि 6 चौकारांचा वर्षाव केला. त्याच्या या वादळी खेळीने हिंदुस्थानच्या मोठय़ा धावसंख्येचा पाया रचला.
मधल्या फळीची ‘विशी’
अभिषेक आणि इशान माघारी परतल्यानंतर मधल्या फळीवर धावगती टिकवण्याची जबाबदारी आली. तिलक वर्माने 28, नितीश कुमार रेड्डीने 21, तर अक्षर पटेलने 20 धावा करत संघाच्या धावसंख्येत मोलाची भर घातली. या फलंदाजांना मोठी खेळी करता आली नसली तरी त्यांच्या छोटय़ा आणि उपयुक्त योगदानामुळे हिंदुस्थानला द्विशतकी टप्पा ओलांडता आला. विंडीजकडून रोस्टन चेस, शमार जोसेफ आणि शमार स्प्रिंगर यांनी प्रत्येकी दोन फलंदाज बाद केले.
Comments are closed.