ज्ञानेशकुमारांना अटक करा, वोटचोर रंगा बिल्लाला सत्तेतून खाली खेचल्याशिवाय आंदोलन थांबणार नाही: हर्षवर्धन सपकाळ.

काँग्रेस व इंडिया आघाडीने वोट चोरीचा मुद्दा मांडत देशभर आंदोलन सुरु केले आहे. ही स्वातंत्र्याची दुसरी लढाई आहे, लोकशाहीच्या मार्गाने सुरु असलेला हा लढा मोडीत काढण्याचा चंग हुकूमशहाने बांधला आहे म्हणूनच राजधानी दिल्लीला लष्करी छावणी बनवले असून ३० हजारांच्यावर पोलीसांचा फौजफाटा आहे. दिल्लीला येणाऱ्या २५० रेल्वे बंद करण्यात आल्या आहेत तर मेट्रोही बंद करण्यात आलेली आहे. आंदोलन दडपून वोट चोरी लपवण्याचा हा प्रयत्न आहे परंतु जोपर्यंत मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमारला अटक करत नाही आणि वोटचोर रंगा बिल्लाला सत्तेतून खाली खेचत नाही तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही, असा इशारा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिला आहे.

दिल्लीतील लोकशाही बचाव आंदोलनात महाराष्ट्रातून प्रभारी डॉ. सिरिवेल्ला प्रसाद, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार, माजी प्रदेशाध्यक्ष आ. नाना पटोले, ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, CWC सदस्य नसीम खान, माजी मंत्री नितीन राऊत, अमित देशमुख, विश्वजित कदम, गोव्याचे प्रभारी माणिकराव ठाकरे, मा. खा. हुसेन दलवाई, AICC सचिव B.M. संदीप, रेहाना चिश्ती, आमदार भाई जगताप, वरिष्ठ उपाध्यक्ष मोहन जोशी, वरिष्ठ प्रवक्ते अतुल लोंढे यांच्यासह राज्यातील नेते व आमदार उपस्थित यांनी सहभाग घेतला.
यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पुढे म्हणाले की, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांच्या मदतीने भाजपाने वोट चोरी केली आहे. SIR च्या माध्यमातून कोट्यवधी नागरिकांचा मतदानाचा हक्क हिरावून घेतला जात आहे. ज्ञानेश कुमारांचे कृत्य देशद्रोहाचे आहे, या वोटचोरीत ते कठपुतली आहेत आणि खरे सुत्रधार रंगा बिल्ला आहेत. लोकशाहीमध्ये निवडणुका निष्पक्ष व पारदर्शक व्हायला हव्यात पण ज्ञानेशकुमारांनी त्याला बगल दिली आहे. देशातील हुकूमशाही शक्तीच्या विरोधात हा लढा असून लोकशाही व संविधान वाचवणे ही आजची गरज आहे. दिल्लीतील आंदोलनात सहभागी होण्यासाठी राज्यातून काँग्रेसचे सर्व आमदार, माजी आमदार-खासदार, जिल्हा काँग्रेस अध्यक्ष व जवळपास हजार कार्यकर्ते आले आहेत. हे आंदोलन फक्त दिल्लीतच सुरु नाही तर गल्ली ते दिल्ली आंदोलन सुरु आहे. इंडिया आघाडीचे नेते आज सरन्यायाधिशांना भेटणार होते, न्यायालयाने वेळ दिल्याचे समजले पण नंतर त्यांनी भेटण्यास नकार दिला, हे काय गौडबंगाल आहे ते समजायला हवे असे सपकाळ म्हणाले.

मुंबईतही वोटचोरीविरुद्ध आंदोलन…

दिल्लीत राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली देशभरातील विरोधी पक्ष एकवटला असताना मुंबईत काँग्रेस पदाधिकाऱ्यांनीही आंदोलन केले. दादर येथील काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवन येथे पदाधिकाऱ्यांनी आंदोलन करून जोरदार घोषणाबाजी केली. मुख्य निडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार, भाजपा आणि मोदी-शाह यांच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. यावेळी प्रदेश सरचिटणीस राजन भोसले, ऍड. संदेश कोंडविलकर, गुरुमितसिंग बच्छर, दिपक वाघमारे, राघवेंद्र शुक्ला, प्रशांत धुमाळ, दत्ता नांदे, संतोष राऊत आदी पदाधिकारी उपस्थित होते.

MPSC घोटाळ्याची वेळेत चौकशी पूर्ण करा.

MPSC चे अध्यक्ष विवेक भिमनवार यांना सरकारने सक्तीच्या रजेवर पाठविले असून MPSC पेपरफुटीच्या चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती नेमली, याचाच अर्थ दाल में कुछ काला है. आता सरकारने सांगितल्याप्रमाणे विहित वेळत ही चौकशी पूर्ण करून संबंधितांवर कारवाई करावी. पण भिमनवार यांची नियुक्तीच चुकीची होती. आपल्या विचारांच्या लोकांना प्रशासनात घुसवणे व पेपरफुटी दडपण्यासाठीच देवेंद्र फडणवीस यांनी भिमनवार यांची नियुक्ती केली होती. या सर्व प्रकरणामुळे एमपीएससीची विश्वासार्हता रसातळाला गेली आहे, असेही हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

Comments are closed.