3-4 शतके झळकावण्याची तयारी असताना कसोटीतून निवृत्ती का घेतली? विराट कोहलीबाबत दिग्गजांचा खुलासा
टीम इंडियाच्या क्रिकेटचा किंग विराट कोहलीने (Virat Kohli) मे 2025 मध्ये कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्याच्या बातमीने क्रिकेटविश्वाला धक्का बसला होता. कारण, विराट इंग्लंड दौऱ्यावर कसोटी मालिका खेळण्याची तयारी करत असल्याचे समोर आले होते. दिल्लीचे माजी प्रशिक्षक सरनदीप सिंग (Sarandeep singh on Virat Kohli) यांच्या मते, विराट या दौऱ्यात 3 ते 4 शतके झळकावण्याचे स्वप्न पाहत होता.
असे असताना त्याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय का घेतला? याबाबत भारताचे माजी सलामीवीर वसीम जाफर (Wasim jafar) यांनी आपले मत मांडले आहे. मात्र, विराटच्या निवृत्तीमागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
विराट कोहलीने 12 मे 2025 रोजी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. भारताच्या सर्वात यशस्वी कसोटी कर्णधारांमध्ये त्याची गणना होते. त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने अनेक मोठे विजय मिळवले होते. त्यामुळे इंग्लंड दौऱ्यापूर्वी त्याने घेतलेल्या निवृत्तीच्या निर्णयामुळे चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला होता. टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर विराट आता फक्त वनडे क्रिकेट खेळत आहे.
भारताचे माजी सलामीवीर वसीम जाफर यांनी त्यांच्या यूट्यूब चॅनेलवर विराटच्या निवृत्तीबाबत चर्चा केली. त्यांच्या मते, विराटला त्याच्याशी झालेल्या वागणुकीबद्दल काहीशी नाराजी असल्याचे वाटत होते. विराटसारख्या मोठ्या खेळाडूमध्ये आणखी कसोटी क्रिकेट खेळण्याची क्षमता होती, असे जाफर यांना वाटते. मात्र, विराटने निवृत्तीचा निर्णय नेमका का घेतला, याचे खरे कारण तो स्वतः याबाबत सांगेल तेव्हाच समजू शकेल, असेही जाफर यांनी स्पष्ट केले.
दिल्लीचे माजी प्रशिक्षक सरनदीप सिंग यांनी सांगितले होते की, जानेवारी 2025 मध्ये रणजी ट्रॉफी (Ranji trophy) सुरू असताना विराट इंग्लंड दौऱ्यात खेळण्यासाठी तयारी करत होता. सरनदीप यांच्या मते, या मालिकेत 3 ते 4 शतके झळकावण्याचे लक्ष्य विराटने ठेवले होते. तसेच इंग्लंड दौऱ्यापूर्वी भारतीय संघाकडून दोन सामने खेळण्याची इच्छाही त्याने व्यक्त केली होती.
निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर (Ajit Agarkar) यांच्या माहितीनुसार, एप्रिल 2025 च्या सुरुवातीला विराटने त्यांच्याशी संपर्क साधून कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याची इच्छा व्यक्त केली होती. दुसरीकडे, सरनदीप सिंग यांच्या विधानानुसार, विराट जानेवारीमध्ये इंग्लंड दौऱ्याची तयारी करत होता. त्यामुळे या दोन घटनांदरम्यान विराटचा निर्णय नेमका कधी आणि का बदलला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
Comments are closed.