दिवाळीत फटाक्यांवर पूर्ण बंदी नाही.

सर्वोच्च न्यायालयाने दिला सुनावणीनंतर केली टिप्पणी

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

फटाके मोठ्या प्रमाणात वाजविल्याने प्रदूषण होते, ही सर्वमान्य बाब आहे. तथापि, या संबंधी न्यायालयाच्या आदेशांपेक्षाही लोकांचे प्रबोधन आणि लोकांचा सहभाग या बाबी अधिक प्रभावशाली ठरतात. दिवाळीच्या काळात फटाक्यांवर संपूर्ण बंदीचा आदेश दिला जाणार नाही. तथापि, लोकांनीच स्वत: प्रदूषणाचा गांभीर्याने विचार करुन संयम बाळगल्यास ते योग्य होईल, अशा अर्थाची टिप्पणी सर्वोच्च न्यायालयाने केली आहे. यामुळे सर्वसामान्य लोकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

आम्ही कोणाच्या धार्मिक भावना दुखावणार नाही. तथापि, लोकांनी स्वत:हून प्रदूषणाचे गांभीर्य समजून घ्यावे आणि स्वत: पुढे यावे, असे आमचे आवाहन आहे. या प्रश्नी समतोल भूमिका घेणे आवश्यक आहे. न्यायालयाने अशी समतोल भूमिका घेतल्यास जनतेलाही स्वत:हून पुढे येण्यासंबंधी प्रोत्साहन मिळेल, अशी टिप्पणी सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी फटाक्यांसंबंधी सुनावणी होत असताना केली.

नकोत कठोर आदेश

फटाक्यांमुळे होणाऱ्या प्रदूषणाच्या मुद्द्याची नोंद सर्वोच्च न्यायालयाने स्वत:हून घेतली आहे. या मुद्द्याचे रुपांतर जनहित याचिकेत करण्यात आले आहे. फटाक्यांचा संबंध धार्मिक भावनांशी आहे. त्यामुळे कोणताही आदेश देताना सावधपणाने दिला गेला पाहिजे. अनावश्यक कठोर किंवा प्रतिबंधात्मक आदेश न्यायालयांनी देऊ नयेत. असा कठोर आदेश दिल्यास त्याचा चुकीचा अर्थ घेतला जाण्याची शक्यता असते. अशा आदेशाकडे लोक जाचक आदेश असल्याप्रमाणे पाहतात. लोकांची अशी भावना होणे स्वाभाविक मानले पाहिजे. त्यामुळे आम्ही आदेश देताना व्यवहार आणि भावना यांचा समतोल राखला पाहिजे. जनतेनेही काही बाबी स्वत:हून समजून घेतल्या पाहिजेत, असे आवाहन त्यांनी केले आहे. ही सुनावणी पुढेही होत राहणार असून दिवाळीच्या आधी अंतिम निर्णय येण्याची शक्यता आहे. फटाक्यांचा संबंध संस्कृतीशी आहे का नाही, याविषयीही चर्चा करण्यात आली.

धर्माचा नाही संबंध

फटाके हा धर्माचा अत्यावश्यक भाग नाही, असा युक्तीवाद या प्रकरणात न्यायालयाच्या साहाय्यक वकील अपराजिता सिंग यांनी केला. फटाक्यांचा प्रश्न प्रतिष्ठेचा करण्यापेक्षा फटाक्यांचे दुष्परिणाम समजून घेणे आवश्यक आहे. सर्वोच्च न्यायालयाने हा प्रश्न वायूशुद्धता व्यवस्थापन आयोगाकडे सोपवावा. या आयोगावर प्रदूषण नियंत्रणाचे उत्तरदायित्व आहे, अशी सूचना अपराजिता सिंग यांनी केली.

प्रबोधन महत्वाचे

केवळ कायद्याची बंधने घालून हा प्रश्न सुटण्यासारखा नाही. समाजातूनच हे प्रबोधन होण्याची आवश्यकता आहे. फटाके हा धर्माशी संबंधित विषय नसला, तरी तो दिवाळीच्या सणाशी जोडला गेला आहे आणि दिवाळी हा धार्मिक उत्सवच असल्याने या दोन्ही बाबी पूर्णपणे भिन्न मानणेही कठीण आहे. त्यामुळेच या संबंधात समतोल निर्णय देण्याची आवश्यकता आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने बनविण्यात आलेल्या फटाक्यांना अनुमती देता येईल काय, यावरही न्यायालयाला विचार करावा लागणार आहे. अशा विशिष्ट प्रकारच्या पुढच्या पिढीतील फटाक्यांचा विचार केला जाऊ शकतो. मात्र, या फटाक्यांची निर्मिती प्रक्रिया, ध्वनीची पातळी आणि इतर बाबींचा विचार करावा लागणार आहे. या आधुनिक फटाक्यांसंबंधी तज्ञांचा अहवाल मागवून घेऊन त्यांचे मूल्यांकन केले जाऊ शकते, असेही विचार सर्वोच्च न्यायालयात व्यक्त करण्यात आले आहेत.

Comments are closed.