केंद्रीय मंत्री मुरुगन यांचा राजीनामा
राज्यसभा सदस्यत्वाचाही त्याग : तामिळनाडूत भाजप मजबूत करण्याची इच्छा
वृत्तसंस्था, नवी दिल्ली
केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदलाच्या चर्चेदरम्यान केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री एल. मुरुगन यांनी स्वत:च्या पदाचा राजीनामा दिला आहे. याचबरोबर त्यांनी राज्यसभा सदस्यत्व सोडण्याचीही घोषणा केली आहे. मुरुगन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लिहिलेल्या विस्तृत पत्रात स्वत:च्या पुढील योजनेचा उल्लेख केला आहे. स्वत:चा पूर्ण वेळ तामिळनाडूत भाजप मजबूत करणे आणि 2029 च्या लोकसभा निवडणुकीच्या तयारीकरता घालवू इच्छित असल्याचे त्यांचे सांगणे आहे.
पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात 5 वर्षांपर्यत केंद्र सरकारमध्ये काम करणे माझ्या जीवनाचा सर्वात मोठा सन्मान राहिला. सार्वजनिक जीवनात येण्यासाठी प्रेरित केलेल्या कामावर आता मी परतू इच्छितो. तामिळनाडूत भाजपला मजबूत करणे आणि राज्यात 2029 च्या लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाला तयार करणे माझी प्राथमिकता असल्याचे मुरुगन यांनी स्वत:च्या पत्रात लिहिले आहे.
केंद्रीय मंत्रिपदापर्यंतचा प्रवास
माझी कुठल्याही राजकीय परिवाराची पार्श्वभूमी राहिलेली नाही. माझे आईवडिल मजूर म्हणून काम करायचे आणि गुरांचे पालन करायचे. माझा परिवार आजही तामिळनाडूच्या कोनूर गावात साधारण जीवन जगत आहे. स्वत:चा पुत्र एक दिवस केंद्र सरकारमध्ये मंत्री होईल अशी कल्पनाही माझ्या आईवडिलांनी केली नव्हती. माझ्या राजकीय प्रवासाचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नेतृत्व आणि भाजपच्या परंपरेचे आहे. तळागाळात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना भाजपमध्ये पुढे जाण्याची संधी मिळते असे मुरुगन यांनी पत्रात नमूद केले आहे. महाविद्यालयीन दशेत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेशी जोडलो गेलो होतो, सुमारे 3 दशकांपर्यंत अभाविप आणि भाजपमध्ये काम करताना माझा मूळ सिद्धांत ‘राष्ट्र प्रथम, पक्ष दुसऱ्या स्थानी तर स्वत: सर्वात अखेरीस’ राहिले असल्याचे त्यांनी म्हटले.
दोनवेळा राज्यसभा खासदार
मुरुगन यांनी राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे उपाध्यक्ष म्हणूनही काम केले आहे. ते दोनवेळा राज्यसभा खासदार झाले असून मागील 5 वर्षांमध्ये केंद्रीय मंत्रिमंडळात सामील राहिले आहेत. यादरम्यान यांनी माहिती-प्रसारण, संसदीय कामकाज, मत्स्यपालन आणि पशुपालनाशी संबंधित मंत्रालयांची जबाबदारी सांभाळली.
पक्ष संघटन मजबूत करणार
तामिळनाडूतील प्रत्येक गाव आणि गल्लीत जाऊन मी लोकांना भेटू इच्छितो. पक्ष कार्यकर्त्यांसोबत उभे राहणे आणि राज्याच्या प्रत्येक हिस्स्यात भाजपची उपस्थिती वाढविणे माझे लक्ष्य आहे. पंतप्रधानांचा ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास’चा संदेश लोकांपर्यंत पोहोचविणार आहे. 2029 च्या लोकसभा निवडणुकीच्या तयारीकरता स्वत:ला पूर्ण झोकून देणार आहे. तामिळनाडूतून भाजपला अधिक जागा जिंकवून देण्याची इच्छा असल्याचे मुरुगन यांनी म्हटले आहे.
Comments are closed.