'सत्ययुग पद्धतीचे' अन्न येथे उपलब्ध आहे.
‘सात्विक’ भोजन ही आपल्या शरीराची खरी आवश्यकता आहे. सहजपणे पचतील आणि शरीराचे योग्य प्रकारे पोषण करतील, असे पदार्थ या भोजनात असणे आवश्यक आहे. केवळ चवीचा विचार करुन निर्माण केलेले पदार्थ शरीरासाठी योग्य असतातच असे नाही. तथापि, सध्याचे युग ‘फास्ट फूड‘चे आहे. अशा प्रकारच्या अन्नाची निर्मिती व्यापारी तत्वावर आणि अधिकाधिक आर्थिक लाभ मिळविण्यासाठी केली जाते. असे अन्न नेहमी खाणाऱ्यांना विविध प्रकारचे पचनाचे विकार होण्याची शक्यता दाट असते. असा अनुभव आल्यानंतर मग माणूस सात्विक भोजनाकडे वळतो. असे भोजन कुठे मिळते याचा शोध घेऊ लागतो. उत्तर प्रदेशातील एका शहरात अशा सात्विक भोजनाची उपलब्धता असलेले एक खाद्यगृह आहे. येथे केवळ सात्विक भोजन मिळते असे नव्हे. तर वेदकाळात ज्या प्रकारचे भोजन त्यावेळचे लोक करीत असत, तसा अनुभव देणारे ‘सत्ययुगीन’ भोजन येथे मिळते. सर्वात महत्वाची बाब अशी, की या भोजनाचे मूल्य कमी असून पोषणमूल्य मात्र मोठे आहे. त्यामुळे ते सर्वसामान्यांना परवडते.
उत्तर प्रदेशातील बुंदेलखंड भागातील झांशी शहरापासून 50 किलोमीटर दूर असणाऱ्या मवई या नगरात हे भोजन मिळते. ते सनापनी पद्धतीने निर्माण केले जाते. या भोजनाच्या थाळीत एकंदर 20 पदार्थ असतात. अनेक प्रकारच्या भाज्या असतात, ज्या शेतातून काढून आणून थेट बनविल्या जातात. सातू, गहू आदी धान्यांपासून बनविलेल्या तीन प्रकारच्या रोटी असतात. कडधान्यांच्या उसळी, ताक इत्यादी सर्व पदार्थ या भोजनाच्या थाळीत असतात. तसेच ही थाळी ‘अमर्याद’ किंवा अनलिमिटेड‘ अशी असते. कढी, डाळभात, वांग्याचे भरीत आदी सर्व चविष्ट पदार्थ येथे अगदी नैसर्गिक स्वरुपात बनविले जातात. लोणची, कोशिंबिरी यांची तर रेलचेल असते. इतके पदार्थ असूनही या थाळीची किंमत शहरातील थाळीपेक्षा कमी आहे. मध्यमर्गिय माणसाला परवडेल असे या भोजनाचे मूल्य आहे. रुचीप्रमाणेच शरीराच्या पोषणविषयक आवश्यकतांचा विचार करुन बनविलेल्या या भोजनाचा आस्वाद घेण्यासाठी दूरदूरवरुन भोजनेच्छू येथे येत असतात. हे भोजन शेतातच बनविले जाते. बनविण्याची पद्धत जुन्या काळातील आहे. स्वयंपाकासाठी चुलींचा उपयोग केला जातो. थाळीत गोड पदार्थही असतात. हे भोजन आता चांगलेच लोकप्रिय झाले असून इतर राज्यांमधील पर्यटकही त्याचा आवर्जून आस्वाद घेतात.
Comments are closed.