पंजाबमध्ये झोटा यांच्या मारेकऱ्याच्या घरावर बुलडोझरचा वापर.

दुकानाला दिले पेटवून : ड्रग्जविरोधी कार्यकर्त्याच्या हत्येप्रकरणी संताप

वृत्तपत्र संस्था, मानसा

पंजाबच्या मानसा येथे ड्रग्जविरोधी कार्यकर्ते परविंदर झोटा यांच्या हत्येनंतर तणाव वाढला आहे. परविंदर झोटा यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपीच्या घरी जात निहंग शिखांनी संताप व्यक्त केला. आरोपीच्या घरात तोडफोड करण्यात आली, सामान बाहेर फेकण्यात आले आणि दुकानाला पेटवून देण्यात आले. तर याचदरम्यान पोलिसांनी झोटा यांच्यावर गोळी झाडणाऱ्या अश्विनीला अटक केली आहे.

परविंदर झोटा यांच्या हत्येचा मुख्य आरोपी अश्विनी विरोधात पंजाब सरकारने बुलडोझर कारवाई केली आहे. परविंदर झोटा यांनी ड्रग्जविक्रीवरून प्रश्न विचारल्यावर एका फार्मसी मालकाने त्यांची हत्या केली होती. झोटा हे अमली पदार्थांच्या विक्रेत्यांना प्रश्न विचारून सोशल मीडियावर लाइव्ह व्हिडिओ तयार करत होते. घटनेपूर्वी झोटा यांचा फार्मसीमालक अश्विनी कुमार यांच्याशी वाद झाला होता. झोटा हे फार्मसी मालकावर सिंथेटिक ड्रग्ज विक्रीचा आरोप करत होते.

या घटनेचा व्हिडिओही समोर आला होता, ज्यात आरोपी पिस्तुलाने धमकावत आणि मग गोळी चालवत असल्याचे दिसून आले होते. झोटा यांनी स्वत:च्या मृत्यूच्या काही दिवसांपूर्वी मानसा येथील अमली पदार्थांच्या विक्रीच्या चौकशीची जबाबदारी सीबीआयला सोपविण्याचे आवाहन केले होते.

घटनाक्रमानंतर मानसा येथील तणाव पाहता मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. आरोपीच्या अटकेनंतरही स्थानिक लोक आणि विविध शीख संघटनांमध्ये नाराजी दिसून आली. निदर्शनांदरम्यान फार्मसीला नुकसान पोहोचविण्यात आले आणि नंतर त्याला पेटवून देण्यात आले.

पंजाबमध्ये यापूर्वी देखील विविध जिल्ह्यांमध्ये अमली पदार्थ विरोधी समित्यांशी निगडित लोक आणि ड्रग्जतस्करीला विरोध करणाऱ्या लोकांच्या हत्या झाल्या आहेत. मे महिन्यात फगवाडा येथे आरटीआय कार्यकर्ते आणि वकील सिमरनजीत सिंह यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.

Comments are closed.