फ्रँकफर्ट-दिल्ली विमान तातडीने उतरवण्यात आले
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
फ्रँकफर्टहून दिल्लीला येणारे एअर इंडियाचे विमान तातडीने जयपूर विमानतळावर उतरविण्यात आले आहे. या विमानाचे अपहरण केले जाईल, अशी धमकी मिळाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. धमकीनंतर या विमानाला जयपूरच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरण्याचा संदेश देण्यात आला. त्यानुसार हे विमान या विमानतळावर बुधवारी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या आसपास सुखरुप उतरले आहे. विमानातील सर्व 306 प्रवासी सुखरुप आहेत. उतरल्यानंतर विमानातून सर्व प्रवाशांना सुरक्षित स्थळी नेण्यात आले. तसेच, विमानाचे सखोल परीक्षण करण्यात आले. तथापि, विमानात कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नाही. त्या हा धमकीचा संदेश बनावट होता, हे आता स्पष्ट झाल्याचे दिसून येते.
विमानाचे अपहरण होण्याची शक्यता आहे, असा संदेश या विमानाच्या वैमानिकानेच अहमदाबाद विमानतळाच्या नियंत्रण कक्षाला पाठविल्याचे स्पष्ट झाले आहे. कदाचित हा संदेश त्याने चुकून पाठविला असावा, असे स्पष्टीकरण विमान नियंत्रण प्राधिकरणाने नंतर दिले. तथापि, या प्रकरणाची चौकशी केली जाणार आहे. या विमानाच्या वैमानिकाने ‘स्क्वॅक 7500 कोड’ अनुसार पाठविण्यात आला होता. या कोडचा संदेश विमानाचे अपहरण होण्याची शक्यता असल्यास विमानाच्या चालकाकडून पाठविण्यात येतो. वैमानिकाला विमानाच्या अपहरणाची धमकी देण्यात आली होती काय, याची चौकशीही आता केली जाणार आहे.
जयपूर विमानतळावर सज्जता
संदेश पोहचल्यानंतर जयपूर विमानतळावर विमानच्या सुरक्षित अवतरणाची सज्जता करण्यात आली होती. सुरक्षा दलांना संदेश देण्यात येऊन सज्ज स्थितीत राहण्याचा आदेश देण्यात आला होता. तसेच, विमानाच्या अवतरणासाठी आवश्यक इतर सर्व बाबी सज्ज ठेवण्यात आल्या होत्या. दहशतवादविरोधी दलाची तुकडीही सज्ज ठेवण्यात आली होती. इतर सुरक्षा प्राधिकरणांच्या तुकड्याही आणण्यात आल्या होत्या. तथापि, हा अपहरणाचा संदेश खोटा असल्याचे त्वरित स्पष्ट झाले.
Comments are closed.