गुन्ह्यांचे ‘ठाणे’! 17 वर्षीय प्रज्योत कांबळेला मित्रांनीच मारलं आणि पुरलं

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

शिवसेना विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्याकांडाने ठाणे हादरले असताना आज एका 17 वर्षीय तरुणाचा मित्रांनीच विश्वासघाताने काटा काढल्याची थरारक घटना ब्रह्मांड परिसरात उघडकीस आली आहे. प्रज्योत कांबळे असे या मृत तरुणाचे नाव आहे.

प्रज्योतच्या गळय़ातील सोन्याच्या चेननेच घात झाला. वाढदिवसाची पार्टी आणि नवी बाईक घेण्यासाठी त्याच्या गळय़ातील चेन चोरण्याकरिताच आधी प्रज्योतला निर्जनस्थळी नेऊन ठार मारले, नंतर पेट्रोल ओतून जाळत त्याचा मृतदेहही पुरला. 20 दिवसांनी या घटनेला वाचा फुटली. पोलिसांनी त्याच्या दोन्ही अल्पवयीन मित्रांना ताब्यात घेतले. खून,  दरोडे, खंडणी वसुलीच्या घटना वाढल्याने सुशिक्षित ठाण्याची ओळख आता गुन्ह्यांचे ठाणे अशी झाली आहे.

चंद्रकांत कांबळे यांचा 17 वर्षीय मुलगा प्रज्योत हा 24 सप्टेंबर रोजी सायंकाळी सातच्या सुमारास घराबाहेर पडला होता. तो परत न आल्याने दुसऱया दिवशी कासारवडवली पोलीस ठाण्यात अपहरणाची तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानुसार गुन्हा नोंदवून पोलिसांनी शोध सुरू केला.

'दृश्यम'प्रमाणे गुह्याचे धागेदोरे लपवले

प्रज्योतचे लोकेशन पोलिसांना समजू नये यासाठी त्याचा मोबाईल एका बसमध्ये टाकून देण्यात आला. 'दृश्यम' चित्रपटाप्रमाणे गुह्याचे धागेदोरे लपवता येतील, असा संशयितांचा समज होता. मात्र सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी आरोपींचा छडा लावला.

खुनाला वाचा फुटली

प्रज्योतच्या जवळच राहणाऱया आणि त्याच्यासोबत दहावीपर्यंत शिकलेल्या एका मित्राने प्रज्योत ब्रह्मांड सर्कलसमोरील रस्त्यावरून एका अनोळखी मुलासोबत पांढऱ्या ऑक्टिव्हावरून घोडबंदरच्या दिशेने गेल्याचे सांगितले. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी परिसरातील 80 ते 90 सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. परंतु त्यातून ठोस माहिती मिळाली नाही. प्रज्योतचा मोबाईल, त्याचे मित्र, नातेवाईक, शाळेतील कर्मचारी यांच्याकडे चौकशी करण्यात आली. यादरम्यान ज्याने प्रज्योत घोडबंदरच्या दिशेने गेला ही माहिती दिली त्याचा मोबाईल तपासला असता  तो काहीतरी लपवत असल्याचा संशय पोलिसांना आला आणि प्रज्योतच्या खुनाला वाचा फुटली. प्रज्योतच्या त्या मित्राने आणखी एका मित्रासोबत त्याचा काटा काढल्याची कबुली दिली. याप्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निवृत्ती कोल्हटकर यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

Comments are closed.