कमी मीठ खाऊनही बीपी वाढतोय?

सध्याच्या धावपळीच्या जीवनशैलीत हाय ब्लड प्रेशर ही एक सामान्य पण तितकीच गंभीर समस्या बनली आहे. सामान्यतः बीपी नियंत्रणात ठेवण्यासाठी डॉक्टर आहारातील मिठाचे प्रमाण कमी करण्याचा सल्ला देतात. बरेच लोक मिठावर नियंत्रण ठेवतात, परंतु तरीही त्यांचे ब्लड प्रेशर अचानक वाढल्याचे दिसून येते. यामागचे मुख्य कारण म्हणजे आपल्या रोजच्या रुटीनमधील काही चुकीच्या सवयी, ज्यांच्याकडे आपले सहसा दुर्लक्ष होते.

ताण आणि चिंता

कामाचा व्याप, कौटुंबिक जबाबदाऱ्या किंवा आर्थिक अडचणींमुळे येणारा तणाव शरीरावर थेट परिणाम करतो. तणावाच्या काळात शरीरात काही विशिष्ट हार्मोन्स तयार होतात, ज्यामुळे हृदयाची गती वाढते आणि रक्तवाहिन्या आकुंचन पावतात. परिणामी, बीपी तात्पुरता वाढतो.

अपुरी झोप

रात्री उशिरापर्यंत जागे राहणे किंवा दररोज पुरेशी झोप न मिळणे याचा थेट परिणाम हृदय व रक्तवाहिन्यांच्या आरोग्यावर होतो. सततच्या अपुऱ्या झोपेमुळे हाय बीपीचा धोका वाढतो. याशिवाय झोपेत जोरात घोरणे किंवा श्वास अडखळणे ही स्लीप ॲप्निया या आजाराची लक्षणे असून यामुळेही बीपी अचानक वाढू शकतो.

ड्रिंक्सचे अतिरिक्त सेवन

दिवसभरात वारंवार चहा किंवा कॉफी पिण्याची सवय असल्यास त्यातील कॅफीन शरीरात जाऊन बीपी वाढवू शकते. त्याचप्रमाणे जिम किंवा कामाच्या वेळी ऊर्जेसाठी प्यायले जाणारे एनर्जी ड्रिंक्सही बीपी वाढवण्यास कारणीभूत ठरतात.

शारीरिक हालचालींचा अभाव

दिवसभर ऑफिसच्या खुर्चीत किंवा सोफ्यावर बसून राहणे, मोबाईल-टीव्हीसमोर तासनतास वेळ घालवणे यामुळे शरीराची कोणतीही हालचाल होत नाही. व्यायाम न केल्याने वजन वाढते आणि हृदय व रक्तवाहिन्यांवर ताण येतो आणि बीपी वाढतो.

तंबाखू आणि अल्कोहोलचे व्यसन

अति मद्यपान आणि तंबाखू, सिगारेटचे सेवन थेट रक्तवाहिन्यांना नुकसान पोहोचवते. निकोटीनमुळे रक्तवाहिन्या कडक होतात आणि बीपी अचानक वाढतो.

हेही वाचा – World Menopause Day : मासिक पाळी थांबताना शरीरावर अन् मनावर नेमके काय परिणाम होतात?

Comments are closed.