Stalemate over Parvinder Jhota’s funeral rites
सीबीआय चौकशीच्या मागणीदरम्यान सरकारकडून समिती स्थापन
वृत्तपत्र संस्था, मानसा
पंजाबच्या मानसामध्ये अमली पदार्थ विरोधी कार्यकर्ते परविंदर सिंह झोटा यांच्या हत्येवरून जारी निदर्शनांदरम्यान राज्य सरकारने चर्चेसाठी पुढाकार घेतला आहे. सरकारने याप्रकरणी चर्चेसाठी 3 महिला आयएएस अधिकाऱ्यांची समिती स्थापन केली आहे. तर दुसरीकडे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची परविंदर सिंह झोटा यांचा परिवार मंगळवारी भेट घेणार आहे.
झोटा यांचे समर्थक आणि त्यांचा परिवार मागील एक आठवड्यापासून निदर्शने करत आहे. परिवाराने अद्याप झोटा यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केलेले नाहीत. परिवार या हत्येप्रकरणी सीबीआय चौकशी करविण्याच्या मागणीवर ठाम आहे. जोपर्यंत सीबीआयला चौकशी सोपविली जात नाही तोवर अंत्यसंस्कार होणार नाहीत असे झोटा यांच्या परिवाराचे सांगणे आहे. याचबरोबर इंसाफ कमिटीकडून राज्य सरकारसमोर आणखी काही मागण्या ठेवण्यात आल्या आहेत.
काय आहेत मागण्या?
परविंदर झोटा यांचा परिवार आणि याप्रकरणी स्थापन इंसाफ कमिटीने मुख्यमंत्री भगवंत मान यांचा राजीनामा तसेच सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. याचबरोबर मृतदेहावर उत्तरीय तपासणी पीजीआयच्या डॉक्टरांच्या टीमकडून करविली जावी अशी परिवाराची इच्छा आहे. इंसाफ कमिटीने शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक कमिटीकडून परविंदर यांना हुतात्म्याचा दर्जा देण्यात यावा अशी मागणी केली आहे. तर परविंदर यांनी स्थापन केलेल्या एंटी ड्रग्ज टास्क फोर्सच्या सदस्यांनी ज्या दुकानानजीक त्यांची हत्या झाली, तेथे त्यांच पुतळा उभारण्यात यावा अशी मागणी केली आहे.
सरकारचे पाऊल
याप्रकरणी चर्चेसाठी मान सरकारने तीन महिला आयएएस अधिकाऱ्यांची एक समिती स्थापन केली आहे. यात कंवलप्रीत कौर बराड, अपनीत रियात आणि मानसाच्या जिल्हाधिकारी नवजोत कौर सामील आहेत. बराड या फरीदकोट विभागाच्या आयुक्त आहेत. तर अपनीत रियात यापूर्वी मानसाच्या जिल्हाधिकारी राहिल्या आहेत.
खून कसा झाला?
ड्रग्जविरोधी कार्यकर्ते परविंदर झोटा यांची हत्या 13 ऑक्टोबर रोजी एका फार्मसीत झाली होती. तेथे परविंदर यांनी दुकानमालकाला सकाळी तेथून ड्रग्ज खरेदी करणाऱ्या व्यक्तीविषयी विचारणा केली होती. यावरून दोघांमध्ये वादावादी झाली, यादरम्यान फार्मसीमालकाने बंदुकीतून गोळी झाडली होती. यात झोटा यांचा मृत्यू झाला होता. हत्येनंतर फार्मसीमालक तेथून फरार झाला होता. नंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली होती. झोटा हे अमली पदार्थ विक्रेत्यांना प्रश्न विचारत सोशल मीडियावर लाइव्ह व्हिडिओ तयार करायचे.
Comments are closed.