अंधेरीत तोडकामात धुळीचे लोट; पालिकेने विकासकाला ठोठावला 35 हजार दंड, काम थांबवण्याची नोटीस
अंधेरी पश्चिम येथील लोखंडवाला परिसरात इमारतीच्या पुनर्विकासासाठी जुन्या इमारतीचे तोडकाम सुरू असताना मोठ्या प्रमाणात धूळ पसरल्याची तक्रार नागरिकांनी केली. या तक्रारीनंतर महापालिकेने विकासकाला 35 हजार रुपयांचा दंड ठोठावला असून डी.जी.एस. लँड डेव्हलपरला काम थांबवण्याची नोटीस बजावली.
लोखंडवाला परिसरातील तोडकामादरम्यान मोठ्या प्रमाणात धूळ पसरल्याची घटना समोर आली. या घटनेचा व्हिडीओ एका सिटीजन ग्रुपने सोशल मीडियावर टाकला. व्हिडीओमध्ये तोडकामाच्या ठिकाणाहून उडणारी धूळ आसपासच्या परिसरात पसरत असल्याचे दिसून आले. त्यानंतर स्थानिक नागरिकांनी पालिका आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे यामध्ये हस्तक्षेप करण्याची मागणी केली.
आवश्यक उपाययोजनांचा अभाव
पालिकेच्या के–पश्चिम विभागाच्या इमारत व कारखाने विभागाने 19 ऑक्टोबर रोजी ही नोटीस जारी केली. यापूर्वी 30 सप्टेंबर रोजी कारणे दाखवा नोटीसही बजावण्यात आली होती. बांधकामस्थळी धूळ नियंत्रणासाठी आवश्यक उपाययोजनांचा अभाव, रस्ते आणि पदपथांवर बांधकाम साहित्याचा साठा तसेच धूळ शोषण यंत्रणेची अनुपलब्धता अशा आठ त्रुटी आढळल्याचे नोटिशीत नमूद करण्यात आले आहे.
Comments are closed.