विहिंपची राहुल गांधींवर टीका
बेताल विधानांपेक्षा आत्मपरीक्षण करण्याची सूचना
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा पुरुषवर्चस्ववादी आणि घटनाविरोधी ‘पंथ’ आहे, या राहुल गांधी यांच्या टीकेला विश्व हिंदू परिषद आणि भारतीय जनता पक्ष यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. राहुल गांधी यांचे आरोप बेताल, दांभिक आणि बौद्धिक दिवाळखोरीचे प्रदर्शन करणारे आहेत, असा घणाघात या संघटनांनी केला.
मंगळवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला तिथीप्रमाणे 101 वर्षे पूर्ण झाली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना 27 सप्टेंबर 1925 या दिवशी विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर झाली आहे. या संघटनेच्या 101 व्या वाढदिनीच राहुल गांधी यांनी अशी उपमर्दकारक टीका केल्याने संघ स्वयंसेवकांमध्ये आणि संघप्रणित संस्थांच्या कार्यकर्त्यांमध्ये संतापाची भावना आहे. राहुल गांधी कोणत्याही विषयावर, त्याचा अभ्यास न करता आणि योग्य माहिती न मिळविता टीका करतात. ही प्रवृत्ती योग्य नाही. त्यांनी ती सुधारण्याची आवश्यकता आहे, अशा अर्थाची टीका भारतीय जनता पक्ष आणि विश्व हिंदू परिषदेने बुधवारी केली आहे.
पक्षपाती टीकेचा निषेध
महिलांच्या संबंधात राहुल गांधी केवळ हिंदू धर्म आणि हिंदू संघटना यांना खोट्या माहितीच्या आधारावर लक्ष्य करीत आहेत. मात्र, इतर धर्मांमध्ये महिलांचे स्थान काय आहे आणि त्यांच्याशी कशी वर्तणूक केली जाते, हे ते स्पष्ट करत नाहीत. केवळ हिंदू धर्माची मानहानी करणे हे त्यांचे ध्येय आहे. ते निवडक पद्धतीने धर्माचा उपयोग राजकारणासाठी करत आहेत, हे यावरुन सिद्ध होते. संघ परिवाराशी संबंधित महिला आपल्याला समर्थन देत आहेत, असा दावाही राहुल गांधी करतात. त्यांना असे पोकळ आणि अहंमान्य दावे करण्याची सवय आहे. ती त्यांनी सोडावी, अशी उपहासगर्भ सूचना विश्व हिंदू परिषदेनेही केली आहे.
राहुल गांधी दांभिक
राहुल गांधी जाहीर सभांमधून आणि पत्रकार परिषदांमधून महिलांच्या सन्मानाचे ढोल बडवितात. पण त्यांचे स्वत:चे वर्तन याच्या नेमके विरुद्ध आहे. एका गर्भवती पत्रकार महिलेने त्यांच्यावर धक्का देऊन पाडल्याचा आरोप केला आहे. तसेच, दिल्लीतील आंदोलनावेळी त्यांनी एका महिला पोलिसालाही ढकलल्याचा आरोप आहे. त्यांची भाषा आणि त्यांचे वर्तन यांचा संबंध जुळत नाही. यामुळे त्यांच्यातील दांभिकता लोकांसमोर प्रदर्शित होते, अशी टीका भारतीय जनता पक्षाने केली.
Comments are closed.