डिसेंबर 2029 पर्यंत अमली पदार्थमुक्त राष्ट्र!

गृहमंत्री अमित शाह यांची घोषणा : हुतात्मा पोलिसांना अभिवादन

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी बुधवारी 31 डिसेंबर 2029 पर्यंत भारताला अमली पदार्थमुक्त करण्याची घोषणा केली. राष्ट्रीय राजधानी दिल्लीतील राष्ट्रीय पोलीस स्मारकात पोलीस स्मृती दिनानिमित्त भाषण देताना त्यांनी ही घोषणा केली. अमली पदार्थांची समस्या संपूर्ण देशासमोर एक गंभीर आव्हान असून आम्ही 31 डिसेंबर 2029 पर्यंत भारतातून अमली पदार्थांची समस्या संपुष्टात आणण्याचे लक्ष्य ठेवले आहे, असे ते म्हणाले. त्यांनी 2026 च्या उर्वरित कालावधीसाठी आणि पुढील तीन वर्षांसाठी अमली पदार्थांविरुद्ध एकजुटीने लढा देण्याचे आवाहनही केले.

पोलीस स्मृती दिनानिमित्त गृहमंत्री अमित शाह यांनी देशाला अमली पदार्थमुक्त करण्यासाठी सर्वांनी एकत्र काम करण्याचे आवाहन केले. राष्ट्रीय पोलीस स्मृती दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी कर्तव्य बजावताना प्राण गमावलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना आदरांजली वाहिली. त्यांनी अंतर्गत सुरक्षेतील केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या योगदानाची प्रशंसाही केली. राष्ट्रीय पोलीस स्मारक हे देशभरातील नागरिकांसाठी आदरांजली वाहण्याचे एक महत्त्वाचे स्थान बनले आहे. येथे 36,852 हुतात्मा पोलीस कर्मचाऱ्यांना आदरांजली वाहिली जाते. यावर्षी हुतात्म्यांच्या यादीत आणखी 154 पोलीस कर्मचाऱ्यांच्या नावांचा समावेश करण्यात आला आहे. या कार्यक्रमादरम्यान इंटेलिजन्स ब्युरोचे संचालक महेश यांनी हुतात्म्यांची नावे वाचून दाखवली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2018 मध्ये राष्ट्रीय पोलीस स्मारकाचे उद्घाटन केले  होते. देशासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांचा सन्मान करणे आणि भावी पिढ्यांना त्यांच्याकडून प्रेरणा घेण्यास प्रोत्साहित करणे, हा याचा उद्देश आहे. 21 ऑक्टोबर 1959 रोजी लडाखमधील हॉट स्प्रिंग्ज येथे चिनी सैन्याच्या हल्ल्यात दहा शूर पोलिसांना वीरमरण आले होते. तेव्हापासून, दरवर्षी 21 ऑक्टोबर हा ‘पोलीस स्मृती दिन’ म्हणून पाळला जातो. पोलीस कर्मच्रायांनी केलेल्या त्यागाची आणि देशाची सुरक्षा व एकता राखण्यात त्यांच्या महत्त्वपूर्ण भूमिकेची दखल घेऊन, पंतप्रधानांनी 2018 च्या पोलीस स्मृती दिनानिमित्त नवी दिल्लीतील चाणक्यपुरी येथे राष्ट्रीय पोलीस स्मारक (एनपीएम) राष्ट्राला समर्पित केले होते.

सुरक्षा सेवा सर्वात महान : शाह

या कार्यक्रमात अमित शाह यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. सर्व सरकारी सेवांमध्ये जर कोणती सेवा सर्वात कठीण असेल, तर ती पोलीस सेवा आहे. देशातील प्रत्येक नागरिक प्रत्येक सण साजरा करतो, पण पोलिसांसाठी कोणताही सण नसतो. ज्या दिवशी आपण सर्वजण आपल्या कुटुंबासोबत सण साजरे करतो, त्याच दिवशी आपले सैनिक देशाची अंतर्गत सुरक्षा, वाहतूक आणि लोकांच्या सुरक्षेची चिंता करत सेवा बजावत असतात. आपल्या कुटुंबापासून दूर राहून, आपल्या आयुष्यातील सुवर्णकाळ राष्ट्रासाठी समर्पित करणे ही एक महान सेवा असल्याचे शाह यांनी सांगितले.

सीएपीएफ जवानांप्रति कृतज्ञता

गृहमंत्री अमित शाह यांनी सीमेवर आणि देशभरात तैनात असलेल्या सीएपीएफ (केंद्रीय सशस्त्र पोलीस दल) जवानांप्रति कृतज्ञता व्यक्त केली. अंतर्गत सुरक्षा राखणे, निवडणुका घेणे आणि लोकशाही प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यात त्यांची भूमिका महत्त्वपूर्ण असते, असे शाह म्हणाले. यावेळी त्यांनी पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचा उल्लेख केला. बंगालसारख्या राज्यात, जिथे प्रत्येक निवडणुकीत शेकडो लोकांचा जीव जातो, तिथे कोणतीही जीवितहानी न होता निवडणुका पार पाडल्याबद्दल त्यांनी सीएपीएफ जवानांची प्रशंसा केली.

 

Comments are closed.