एसबीआयच्या ४ हजार ग्राहकांचा डेटा लीक झाला आहे
‘सिरियससिम’ या हॅकर ग्रुपवर संशय : वैयक्तिक माहिती डार्क वेबवर उपलब्ध
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’च्या (एसबीआय) सुमारे 4,000 ग्राहकांचा डेटा डार्क वेबवर लीक झाला आहे. ‘एसबीआय’ने बुधवारी यासंबंधीची माहिती देताना या डाटा लीकची चौकशी सुरू असल्याचे स्पष्ट केले. डार्क वेबवर लीक झालेल्या डेटामध्ये 3,897 ग्राहकांच्या वैयक्तिक ओळखण्यायोग्य माहितीचे (पीआयआय) रेकॉर्ड आढळले आहेत. ‘पीआयआय’मध्ये नाव, मोबाईल क्रमांक, ईमेल पत्ता, आधार किंवा बँक सीआयएफ क्रमांकासारख्या तपशिलांचा समावेश आहे.
‘सिरियससिम’ नावाच्या एका अज्ञात हॅकर ग्रुपने एसबीआयचा ग्राहक डेटा, कर्ज अर्ज आणि खाते उघडण्याची कागदपत्रे हॅक केल्याचा दावा केल्यानंतर बँकेने अधिकृत निवेदन जारी केले आहे. एसबीआयने आपल्याला 16 ऑक्टोबर रोजी डार्क वेबवरील डेटा लीकबद्दल सूचना मिळाल्या होत्या, असे म्हटले आहे. या सूचना बँकेची थ्रेट इंटेलिजन्स सर्व्हिस प्रोव्हायडर, डिफेन्स सायबर एजन्सी आणि इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम यांनी जारी केल्या होत्या. या सूचना मिळाल्यापासून लगेचच बँकेच्या तांत्रिक टीमने चौकशी सुरू केली आहे. या अलर्टनंतर डार्क वेबवर उपलब्ध असलेल्या अंदाजे 3,75,000 रेकॉर्ड्सचे प्राथमिक विश्लेषण करण्यात आले. या तपासादरम्यान एकूण 3.89 लाखांहून अधिक रेकॉर्ड्सपैकी 3,897 ग्राहकांची वैयक्तिक माहिती या डेटामध्ये आढळल्याचे सांगण्यात आले. सायबर सुरक्षा मॉनिटरिंग अकाउंट ‘सायबरपल्स56’ने 16 ऑक्टोबर रोजी ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हा दावा सर्वप्रथम समोर आणला होता.
Comments are closed.