पडद्याआडून – प्रोजेक्ट एबी शोध बहिणाबाईंचा, स्वतःचाही!
>> पराग खोत
आजच्या तरुणाईच्या हातात मोबाईल आहे, डोळ्यांत स्वप्नं आहेत आणि मनात यशस्वी होण्याची घाई आहे. मात्र या धावपळीत जगण्याचा खरा अर्थ समजून घ्यायला वेळ आहे का? यशाच्या मागे धावताना स्वतःलाच हरवून बसलेल्या तरुण पिढीला आयुष्याकडे नव्या नजरेनं पाहायला लावण्याचं काम ‘प्रोजेक्ट एबी’ हा दीर्घांक करतो. बहिणाबाई चौधरी यांच्या कवितांचा आणि त्यांच्या सोप्या, सरळ तत्त्वज्ञानाचा आधार घेत आजच्या पिढीच्या कलाजाणिवांचा आणि जगण्याचा शोध घेणं, ही या कलाकृतीची मध्यवर्ती कल्पना आहे.
मिनी आणि पिनाकी ही या नाटकातील दोन तरुण पात्रं आहेत. मिनीला अभिनयाच्या क्षेत्रात स्वतःचं स्थान निर्माण करायचं आहे, तर पिनाकीला संगीतकार म्हणून नाव कमवायचं आहे. दोघांकडे स्वप्नं आहेत, महत्त्वाकांक्षा आहे, पण स्वप्नं प्रत्यक्षात आणण्यासाठी आवश्यक असलेली समज, अनुभव आणि संयम यांची कमतरता आहे. कलाक्षेत्रातील विखारी स्पर्धा, काम मिळवण्यासाठी करावी लागणारी तडजोड, ओळखींचं महत्त्व आणि वारंवार पदरी पडणारं अपयश यामुळे त्यांचा आत्मविश्वास डळमळतो. कला हेच आयुष्य मानणाऱया या तरुणांसमोर परिस्थितीशी जुळवून घेण्याचं आव्हान उभं राहतं.
अचानक मिनीकडे बहिणाबाईंच्या जीवनावर नाटकात काम करण्याची संधी चालून येते. मात्र बहिणाबाईंचं जगणं, त्यांची भाषा आणि त्यांच्या कवितांमधील जीवनानुभव समजून घेणं तिला कठीण जातं. पिनाकीला त्यांच्या कवितांना आधुनिक संगीताची जोड द्यावीशी वाटते. पण केवळ आधुनिक सादरीकरण म्हणजे कलाकृतीचं आकलन नव्हे, हे त्यांना हळूहळू उमगत जातं. दरम्यान निराश झालेली मिनी अभिनयाचं क्षेत्र सोडून नोकरी स्वीकारते. तिथे आलेल्या एका अनुभवामुळे तिच्या विचारांना नवी दिशा मिळते. बहिणाबाईंच्या कवितांमधून तिला जगण्याचं वेगळं भान येतं आणि ती पुन्हा त्या प्रोजेक्टकडे वळते. प्रोजेक्ट एबी म्हणजे ‘प्रोजेक्ट आपली बहिणाई.’
इथून नाटकाला महत्त्वाचं वळण मिळतं. बहिणाबाई या केवळ अभ्यासाचा विषय राहत नाहीत, त्यांच्या कवितांमधून व्यक्त होणारा जीवनानुभव मिनी आणि पिनाकीच्या जगण्याशी जोडला जातो. त्यांच्या सादरीकरणातून दोघांनाही स्वतःच्या कलेचा आणि स्वतःचाही नव्यानं परिचय होतो. दुसऱया काळात जगलेल्या एका ग्रामीण, अशिक्षित स्त्राrच्या अनुभवांत आजच्या सुशिक्षित तरुणाईला स्वतःच्या प्रश्नांची उत्तरं सापडू शकतात, ही जाणीव नाटक अधोरेखित करतं आणि हेच या नाटकाचं सर्वात मोठं वैशिष्टय़ ठरतं.
लेखक राजीव जोशी यांनी त्यांच्या लेखणीतून दोन पिढय़ांचा अर्थपूर्ण संवाद घडवून आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलाय. तरुणांच्या संघर्षाला बहिणाबाईंच्या कवितेचा आधार देत त्यांनी एक वेगळं नाटय़ उभं केलंय. त्यांच्या शब्दांतून उमटणारं तत्त्वज्ञान पुस्तकात बंदिस्त राहत नाही, ते जगण्याचा भाग बनतं. या कवितांचा परिचय नव्या पिढीला करून देण्याचा प्रयत्न म्हणून ‘प्रोजेक्ट एबी’चं महत्त्व आहे. परंपरा जपणं म्हणजे ती केवळ पाठ करणं नव्हे, तर तिचा अर्थ समजून घेऊन तो वर्तमानाशी जोडणं, हा विचारही यातून पुढे येतो.
नाटकाच्या पूर्वार्धात मिनी आणि पिनाकीचा संघर्ष अधिक ठसठशीतपणे उभा राहण्याची गरज जाणवते. त्यांची स्वप्नपूर्तीची धडपड, अपयशाची बोच आणि मानसिक घालमेल यांना अधिक परिणामकारकपणे आकार मिळाला, तर पुढील परिवर्तन अधिक भिडणारं ठरू शकेल. काही ठिकाणी कलाकारांच्या शब्दोच्चारांवर आणि शब्दफेकीवर अधिक मेहनत घेतल्यास संवादांचा आशय प्रेक्षकांपर्यंत अधिक प्रभावीपणे पोहोचेल.
उत्तरार्धात बहिणाबाईंच्या व्यक्तिमत्त्वाचा आणि कवितांचा प्रभाव रंगमंचावर अधिक ठळकपणे जाणवू लागतो. बहिणाबाईंच्या भूमिकेतील कलाकाराच्या संयत वावरामुळे या व्यक्तिरेखेला भावनिक खोली लाभते. मिनीच्या जाणिवांमध्ये होणारा बदल आणि बहिणाबाईंच्या दृष्टिकोनातून जगाकडे पाहण्याची तिची प्रक्रिया नाटकाला वेगळं परिमाण देते. संगीत, नेपथ्य, प्रकाशयोजना आणि नृत्यरचना यांची योग्य सांगड घातली गेल्याने या अनुभवातील काव्यात्मता आणखी खुलते. दिग्दर्शक हेमंत सुहास भालेकर यांनी खूप विचारपूर्वक हा प्रयोग बसवला आहे. कविता मानकर-जाधव यांनी अतिशय साधेपणाने बहिणाबाई साकारली आहे. ओंकार घाडी यांनी तरुण तरीही परिपक्व असा पिनाकी नीट दाखवलाय. ते स्वतः या नाटकाचे संगीतकार असल्याने त्यांचा वावर सहज आहे. अनेक वाद्यांच्या वादनावर त्यांची असलेली हुकूमत भूमिकेला अनुरूप ठरते. आरोही वैद्य यांनी मिनी ते बहिणाई हा प्रवास करण्याचा प्रयत्न केलाय. त्यातली मिनी अधिक सजग असायला हवी असे वाटते.
‘प्रोजेक्ट एबी’ हा केवळ एका नाटय़प्रकल्पाच्या यशाची गोष्ट नाही. स्वतःला सिद्ध करण्याच्या धडपडीत आपण नेमपं काय शोधतो आहोत, हा प्रश्न ते प्रेक्षकांसमोर ठेवतं. नव्या पिढीला जुन्या पिढीकडून शिकण्यासारखं बरंच काही आहे आणि जुन्या पिढीच्या अनुभवांना नव्या अभिव्यक्तीची जोड मिळू शकते, हेही या नाटकातून सूचित होतं. बहिणाबाईंच्या कवितांचा हात धरून स्वतःच्या जगण्याकडे नव्यानं पाहण्याची संधी देणारा हा दीर्घांक आहे. कारण कधी कधी आयुष्याचं मोठं तत्त्वज्ञान समजण्यासाठी मोठमोठय़ा पुस्तकांची गरज नसते, साध्या माणसाच्या साध्या शब्दांतही जगण्याचा अर्थ दडलेला असतो. तो अर्थ शोधण्याची सुरुवात झाली की, माणूस केवळ कलाकार म्हणून नव्हे, तर माणूस म्हणूनही समृद्ध होतो. ‘प्रोजेक्ट एबी’चा खरा शोध इथेच पूर्ण होतो.
लेखक: राजीव जोशी
दिग्दर्शक ः हेमंत सुहास भालेकर
कलाकार: आरोही जैन, ओंकार घाडी आणि कविता मानकर-जाधव
बॅकस्टेज: प्रदीप पाटील
प्रकाशयोजना ः विलास हुमणे
नृत्य-आरेखन ः देवेंद्र शेलार
पोशाख: प्रकाश निमकर
सूत्रधार ः विजय मोंडकर, प्रकाश गद्रे, जयवंत देसाई, वसंत आंजर्लेकर
छायाचित्र सौजन्य ः संजय पेठे
Comments are closed.