मुंबईकरांची रहदारीकोंडीतून सुटका होणार, शीव, विद्याविहार आणि गोरेगाव उड्डाणपुलांचे आज लोकार्पण
तब्बल ११२ वर्षे जुन्या शीव रेल्वे पुलाच्या जागी उभारलेल्या नव्या उड्डाणपुलासह विद्याविहार आणि गोरेगाव-मुलुंड जोडमार्गावरील उड्डाणपूल गुरुवारी मुंबईकरांना वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उड्डाणपुलांचे लोकार्पण केले जाणार असून या उड्डाणपुलांमुळे मुंबई शहर आणि उपनगरांतील वाहतूककोंडीचा ताण मोठ्या प्रमाणावर कमी होण्यास मदत होणार आहे. बांधकाम पूर्ण होऊनही अनेक दिवसांपासून हे उड्डाणपूल उद्घाटनाच्या प्रतीक्षेत होते. अखेर गुरुवारचा मुहूर्त सापडला.
महापालिकेतर्फे उभारण्यात आलेल्या शीव आणि विद्याविहार रेल्वे स्थानकांजवळील रेल्वे उड्डाणपूल आणि गोरेगाव-मुलुंड जोडमार्गावरील उड्डाणपुलाचे लोकार्पण गुरुवारी दुपारी १ वाजता व्हर्च्युअल पद्धतीने करण्यात येणार आहे. मुंबईच्या महापौर रितू तावडे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील. कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण उड्डाणपुलांच्या ठिकाणी केले जाणार आहे. लोकार्पण सोहळ्याला राज्याचे कॅबिनेट मंत्री, खासदार-आमदार, पालिकेतील सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचे प्रतिनिधी, महापालिकेचे अधिकारी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तिन्ही उड्डाणपूल एकाचवेळी वाहतुकीसाठी खुले होणार असल्यामुळे मुंबईकरांना शहर आणि उपनगरांतील वाहतूककोंडीच्या समस्येपासून मोठा दिलासा मिळणार आहे.
Comments are closed.