द फ्रेंडशिप फाईल्स; मोदींकडून हजारो कोटींची जमीन अदानींना 1 रुपया मीटरने आंदण, राज ठाकरे यांनी पोस्ट केली डॉक्युमेंट्री

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

चार महिन्यांमध्ये देशात काहीतरी मोठे घडणार असल्याची भीती बुधवारी व्यक्त केल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज आपल्या अधिकृत फेसबुक अकाऊंटवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्योगपती गौतम अदानी यांच्या संबंधांवर भाष्य करणारी ‘द फ्रेंडशिप फाईल्स’ ही वादग्रस्त डॉक्युमेंट्री पोस्ट केली. मोदींकडून हजारो कोटींची जमीन अदानींना एक रुपया मीटरने आंदण दिली गेल्याचा पर्दाफाश या डॉक्युमेंट्रीमध्ये करण्यात आला असल्याने सरकारने ती सोशल मीडियावरून गायब होण्यापूर्वीच पाहून घ्या, असे आवाहन राज ठाकरे यांनी केले आहे.

गुजरातच्या मुंद्रा येथील एका छोटय़ा बंदराचा ताबा असलेले अदानी पंतप्रधान मोदींच्या सत्ताकाळात उद्योगपती अंबानींपेक्षाही पुढे गेले. मोदींच्या आशीर्वादाने अदानींची ही प्रगती कशी झाली त्याचा लेखाजोखा या डॉक्युमेंट्रीमध्ये मांडण्यात आला आहे. गुजरात दंगलीनंतर मोदी एकाकी पडले तेव्हा त्यांना अदानी यांनीच मैत्रीचा आधार दिला होता. मोदींनीही त्या मैत्रीची परतफेड करताना देशाच्याच नव्हे तर जगाच्या कानाकोपऱयात अदानींच्या व्यवसायाचा विस्तार कसा केला त्याची माहिती या डॉक्युमेंट्रीत देण्यात आली आहे.

टाटांना 900, फोर्डला 1100 आणि अदानींना फक्त 1 रुपया दर

सन 2000 पर्यंत अदानींचे मुंद्रा येथे छोटे बंदर होते. 2003 पासून मोदी-अदानी समीकरण घट्ट होत गेले आणि 2011 पर्यंत अदानींकडे तेथील 15 हजार एकर आली. तीसुद्धा फक्त 1 रुपया चौरस मीटर दराने. टाटा समूहाला नॅनो प्रकल्पासाठी जमीन हवी होती तेव्हा सवलतीच्या दरातही ती 900 रुपये चौरस मीटरने दिली गेली. फोर्ड कंपनीनेही प्रति चौरस मीटरला 1100 रुपये दिले. अदानींना मात्र मोदींचे मित्र म्हणून कवडीमोल दराने जमीन दिली गेली.

अदानींच्या बंदरातून ड्रग्जची वाहतूक

देशात येणाऱया एकूण मालापैकी एक चतुर्थांश माल हा अदानींच्या मुंद्रा पोर्टमधून देशात येतो. याच पोर्टमधून लाखो कोटी रुपयांचे ड्रग्जही आले होते. त्यांच्या विक्रीतून मिळणारा पैसा दहशतवादी संघटनांसाठी वापरला जात होता, परंतु ते प्रकरण सराईतपणे दडपण्यात आले असे या डॉक्युमेंट्रीत दाखवले गेले आहे.

अदानींसाठीच मोदींचे परदेश दौरे

एलआयसीचे 48 हजार कोटी रुपये सरकारने अदानींच्या शेअर्समध्ये गुंतवले. 2022 मध्ये श्रीलंकेतीलही एका प्रकल्पासाठी मोदींनी दबाव आणल्याचा आरोप तेथील एका अधिकाऱयाने केल्याचा दावा या डॉक्युमेंट्रीत केला आहे. त्यानंतर नॉर्वेने अदानींना देण्यात येणाऱया प्रकल्पाचा निर्णय रद्द केल्यामुळेच मोदींनी नॉर्वेला धाव घेतली होती, असेही सांगण्यात आले आहे.

मोदींच्या कृपेने देशातील घराघरात अदानींची घुसखोरी

22 मे 2014 रोजी नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान म्हणून शपथ घ्यायला विमानाने दिल्लीला गेले होते. ते विमान अदानी यांचे होते. त्यानंतर 2016 पर्यंत अदानी यांनी अंबानींच्याही पुढे मजल मारली असे ही डॉक्युमेंट्री सांगते. आज देशातील घराघरात अदानी घुसले आहेत. हिमाचलमधील सफरचंदाचा दर अदानी ठरवतात. घरातील गॅस, रस्त्यांना लागणारे सिमेंट, पाणी पुरवठा, ऊर्जा निर्मिती व पुरवठा, सौरऊर्जा निर्मिती आणि इतकेच नव्हे तर अणुऊर्जा क्षेत्रातही मोदींच्या मदतीने अदानींनी पाय पसरले आहेत, असा आरोप या डॉक्युमेंट्रीत करण्यात आला आहे.

Comments are closed.