बादल यांनी काँग्रेसशी हातमिळवणी करण्यास नकार दिला

वृत्तपत्र संस्था, भटिंडा

पंजाबमध्ये विधानसभा निवडणुकीपूर्वी नवे राजकीय समीकरण निर्माण होत असल्याचे दिसून येते. शिरोमणी अकालीदलाने आम आदमी पक्ष किंवा काँग्रेसच्या व्यतिरिक्त अन्य पक्षांसोबत आघाडी करण्यास तयार असल्याचे स्पष्ट केले आहे. भाजप अन् शिअद यांच्यात आघाडी होऊ शकते अशी चर्चा असताना हे वक्तव्य समोर आले आहे. परंतु दोन्ही पक्षांनी यावर सध्या अधिक बोलणे टाळले आहे.

अकाली दल एक प्रादेशिक पक्ष आहे आणि आमच्यासाठी पंजाब सर्वप्रथम आहे. आम्ही सरकार स्थापन करू  किंवा नाही करू शकू, आम्ही पंजाबच्या लोकांसाठी लढत राहू. आमच्या नजरेत पंजाबचे दोन सर्वात मोठे शत्रु काँग्रेस आणि आम आदमी पक्ष आहेत. या पक्षांसोबत आमची आघाडी कधीच होऊ शकत नाही. शिरोमणी अकाली दलाची विचारसरणी आणि कार्यक्रमांशी सहमत असलेल्या अन्य पक्षांसोबत आघाडी करण्यास आम्ही तयार आहोत असे उद्गार शिअद प्रमुख सुखबीर सिंह बादल यांनी काढले आहेत.

भाजपच्या भूमिकेकडे लक्ष

भाजप सध्या शिअदसोबत आघाडी करण्यास नकार देताना दिसून येत आहे. 19 सप्टेंबर रोजी केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी भाजप अकाली दलासोबत आघाडी करणार नसल्याचे म्हटले होते. तसेच भविष्यात दोन्ही पक्ष एकत्र आल्यास जागावाटप समान अटींच्या आधारावर होईल, परंतु अंतिम निर्णय पक्षनेतृत्वाकडूनच घेतला जाईल असे स्पष्ट केले होते. दोन्ही पक्षांदरम्यान 22 जागांचा फॉर्म्युला आता काम करणार नाही, भाजप छोट्या भागीदाराची भूमिका निभावणार नसल्याची भूमिका त्यांनी मांडली होती.

अनेक अनुमान

कुठल्याही पक्षाने आघाडीस नकार दिलेला नाही. जर पक्ष पंजाबमध्ये कुणासोबत आघाडी करत असेल तर तो सुखबीर बादल यांचा शिअद असेल. शिद (सुरजीत) आणि अकाली दल (वारिस पंजाब दे) नोंदणीकृत नसल्याचे भाजपच्या एका नेत्याने म्हटले आहे. शिअद आमचा जुना साथीदार असून त्याच्यासोबत आघाडी होण्याची शक्यता अधिक आहे. परंतु कोणत्या मुद्द्यांवर चर्चा होणार यावर हे सर्व निर्भर आहे. भाजप निश्चितपणे छोट्या भावाच्या भूमिकेत नसेल असे या नेत्याचे सांगणे आहे.

Comments are closed.