द्रमुकचे माजी मंत्री लाचखोरी प्रकरणात अटक
खासगी शाळांकडून 100 कोटी रुपयांची लाच घेतल्याचा आरोप
वृत्तसंस्था/ चेन्नई
खासगी शाळांना परवाने आणि इतर मंजुऱ्या देण्याशी संबंधित 100 कोटी रुपयांच्या कथित भ्रष्टाचार प्रकरणात तामिळनाडूचे माजी शालेय शिक्षणमंत्री आणि द्रमुक नेते अंबिल महेश पोय्यामोझी यांना चेन्नई पोलिसांच्या सेंट्रल क्राईम ब्रँचने (सीसीबी) सोमवारी अटक केली. या कथित लाचखोरीच्या घोटाळ्यामुळे 177 खासगी शाळा प्रभावित झाल्याचा तपास यंत्रणांना संशय आहे. सरकारी मंजुऱ्या मिळवून देण्याच्या आश्वासनावर खासगी शाळांकडून पैसे उकळल्याच्या आरोपांच्या तपासानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. या घोटाळ्यामुळे कथितरित्या प्रभावित झालेल्या 177 शाळांची ओळख पोलिसांनी पटवली आहे.
डीएमके नेते आणि माजी शिक्षणमंत्री महेश यांच्यावर या प्रकरणात आरोप ठेवण्यात आले आहेत. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, तपासादरम्यान भ्रष्टाचारात त्यांचा कथित सहभाग असल्याचे पुरावे सापडले आहेत. तपासादरम्यान, पोलिसांनी डिजिटल उपकरणांमधून पुरावे गोळा केले आणि अनेक व्यक्तींचे जबाब नोंदवले. यानंतर, पोलिसांनी त्यांच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या कलमांनुसार अटक केली आहे. माजी मंत्री महेश यांनी हे आरोप फेटाळून लावत आपल्याविरुद्ध दाखल केलेल्या गुह्याला आव्हान दिले आहे.
द्रमुकचा टीव्हीकेवर आरोप
सत्ताधारी टीव्हीके सरकार आपल्या राजकीय विरोधकांना लक्ष्य करण्यासाठी तपास यंत्रणांचा गैरवापर करत असल्याचा आरोप द्रमुकने केला आहे. यापूर्वी, मद्रास उच्च न्यायालयाने सोमवारी महेश यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. आता महेश यांनी त्यांच्याविरुद्ध दाखल केलेला एफआयआर रद्द करण्यासाठी स्वतंत्रपणे न्यायालयात धाव घेतली आहे.
Comments are closed.