अर्णब चक्रीवादळ आंध्र किनारपट्टीकडे सरकले आहे.
6 लाख लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येणार : ओडिशामधील शाळा-महाविद्यालयांना सुटी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
अर्णब चक्रीवादळ बंगालच्या उपसागरातून आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीकडे सरकत आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, 27 ऑक्टोबरपर्यंत त्याचे चक्रीवादळात रुपांतर होण्याची शक्यता आहे. 28 ऑक्टोबरच्या सकाळी ते आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे. यादरम्यान, किनारपट्टी परिसरात वाऱ्याचा वेग ताशी 140 किलोमीटरपर्यंत पोहोचू शकतो. या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर आंध्र प्रदेशातील अंदाजे 6 लाख लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्याची तयारी सुरू आहे.
चक्रीवादळामुळे किनारपट्टीनजिकच्या जिह्यांसाठी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मच्छिमारांना 29 ऑक्टोबरपर्यंत समुद्रात न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. ओडिशालाही या चक्रीवादळाचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. मदत आणि बचाव कार्यासाठी 60 पथके तैनात करण्यात आली आहेत. ओडिशात 28 आणि 29 ऑक्टोबर रोजी सहा जिह्यांमधील शाळा आणि महाविद्यालये बंद राहतील. वादळाच्या प्रभावामुळे मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशसह 10 राज्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. दरम्यान, तामिळनाडूमध्ये गेल्या तीन दिवसांपासून संततधार पाऊस पडत आहे. आर्णीमधील भास्कर नगरमध्ये पाणी साचले आहे. लोक घरात अडकले आहेत. कोडाईकनालमध्ये पर्यटकांच्या प्रवेशावर बंदी घालण्यात आली आहे. तिरुवरूर जिह्यातही मुसळधार पाऊस झाला. मात्र, शाळा आणि महाविद्यालये सुरू राहिली.
मध्य प्रदेशात मंगळवारपासून पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. पन्ना, सतना, रेवा, मौगंज, मैहर, सिधी, उमरिया, शहडोल, अनुपपूर, दिंडोरी आणि बालाघाटसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे, तर छतरपूर, कटनी, जबलपूर, मंडला, छिंदवाडा आणि सिवनीमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. पावसाच्या इशाऱ्यापूर्वी राज्यात रात्रीच्या तापमानात घट झाली. कटनीमधील करौंडी येथे राज्यातील सर्वात कमी किमान तापमान 13.7 अंश सेल्सिअस नोंदवले गेले.
दोन दिवसांचा हवामान अंदाज
27 ऑक्टोबर : आंध्र प्रदेशात मुसळधार पावसासाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. ओडिशामध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. छत्तीसगड, तेलंगणा, तामिळनाडू, पुद्दुचेरी, केरळ, कर्नाटक आणि रायलसीमामध्ये पावसासाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
28 ऑक्टोबर : आंध्र प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा आणि ओडिशामध्ये मुसळधार पावसासाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. झारखंडमध्ये ऑरेंज अलर्ट तर, पश्चिम बंगाल, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, पूर्व मध्य प्रदेश, विदर्भ आणि कर्नाटकमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
Comments are closed.