आव्हानांचा सामना करण्यासाठी सामूहिक प्रयत्न आवश्यक आहेत

‘ब्रिक्स संसदीय फोरम’मध्ये ओम बिर्ला यांचे आवाहन

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

संसदीय सहकार्यातून सामायिक आव्हानांवर उपाय शोधण्यासाठी आणि नागरिकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी सामूहिक प्रयत्न आवश्यक असल्याचे प्रतिपादन लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी केले आहे. संसद भवनाच्या ऐतिहासिक संविधान सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवसीय ‘12व्या ब्रिक्स संसदीय फोरम, 2026’चे उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. याप्रसंगी त्यांनी जगभरात शांतता, सहकार्य आणि शाश्वत विकासाला चालना देण्यासह आंतरराष्ट्रीय सहकार्याला नवीन गती देण्याचे आवाहन सर्व सहभागी देशांच्या प्रतिनिधींना केले.

ब्रिक्स सदस्य आणि भागीदार देशांच्या संसदीय प्रतिनिधींचे स्वागत करताना बिर्ला यांनी भारतातील उपस्थिती संसदीय सहकार्य, संवाद, परस्पर आदर आणि लोकशाही मूल्यांवरील सामायिक विश्वास दर्शवते, असे बिर्ला यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ब्रिक्स राष्ट्रप्रमुखांच्या शिखर परिषदेत संयुक्त निवेदन एकमताने स्वीकारण्यात आले. जग सध्या प्रादेशिक संघर्ष, युद्ध, आर्थिक अस्थिरता, व्यापारी तणाव, दहशतवाद आणि हवामान बदल यांसारख्या गंभीर आव्हानांना तोंड देत आहे. या आव्हानांचा परिणाम कोणत्याही एका देशाच्या सीमेपुरता मर्यादित नाही. अशा वेळी, संवाद, मुत्सद्देगिरी आणि परस्पर सहकार्याचे महत्त्व अधिकच वाढते, असे बिर्ला म्हणाले.

दहशतवाद ही जगातील एक गंभीर समस्या

जागतिक संघर्ष, आर्थिक अस्थिरता, दहशतवाद आणि हवामान बदल यांसारख्या आव्हानांचा परिणाम कोणत्याही एका देशाच्या सीमांपुरता मर्यादित नाही आणि त्यावर उपाययोजना करण्यासाठी संवाद, मुत्सद्देगिरी आणि संसदीय सहकार्य महत्त्वपूर्ण आहे. दहशतवाद ही जागतिक पातळीवरील एक गंभीर समस्या असून आंतरराष्ट्रीय तणाव कमी करण्यासाठी संवाद, परस्पर सामंजस्य आणि संसदीय सहकार्य मजबूत करणे आवश्यक असल्याचेही बिर्ला यांनी आपल्या संबोधनात स्पष्टपणे सांगितले. जागतिक मंचावरील चर्चा केवळ चर्चेपुरती मर्यादित न राहता, त्यातून सर्वसामान्य नागरिकांना लाभ देणारी धोरणे आणि व्यावहारिक सहकार्य निर्माण झाले पाहिजे, यावरही त्यांनी भर दिला.

सहकार्य वाढवण्यावर भर

परस्पर सामंजस्य आणि विश्वास दृढ करण्यात, आंतरराष्ट्रीय तणाव कमी करण्यात आणि जागतिक आव्हाने शांततेने सोडवण्यात संसद महत्त्वाची भूमिका बजावू शकते, असेही बिर्ला यांनी सांगितले. संसदीय मुत्सद्देगिरीद्वारे, विविध देशांचे लोकप्रतिनिधी अनुभवांची देवाणघेवाण करू शकतात, समान हितसंबंध ओळखू शकतात आणि परस्पर सहकार्यासाठी नवीन संधी विकसित करू शकतात.

लोककेंद्रित विकासावर ‘ब्रिक्स’चा भर

दोन दिवसीय 12 व्या ब्रिक्स संसदीय मंचाचे आयोजन भारतीय संसदेतर्फे करण्यात आले आहे. ‘लोककेंद्रित विकासासाठी संसदेला बळकट करणे’ ही या परिषदेची मुख्य संकल्पना आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही सोमवारी उद्घाटन सत्रात भाग घेत विविध देशांच्या संसदीय प्रतिनिधी मंडळांच्या नेत्यांची भेट घेतली. या परिषदेला ब्रिक्स सदस्य राष्ट्रे आणि भागीदार देशांचे संसदीय प्रतिनिधी सहभागी झाले आहेत. दोन दिवसीय परिषदेत लवचिकता, नावीन्य, सहकार्य आणि शाश्वतता या चार प्रमुख विषयांवर चर्चा होईल. सोमवारच्या सत्रात राज्यसभेचे उपसभापती हरिवंश यांनीही परिषदेला संबोधित केले. लोकसभेचे महासचिव उत्पल कुमार सिंह यांनी स्वागतपर भाषण केले.

Comments are closed.